महाडीबीटी पोर्टलः‘अर्ज एक,योजना अनेक’


 

अकोला,दि. 22(जिमाका)- कृषि विभागाने आता महाडीबीटी पोर्टलवर शेतकरी योजना या सदराखाली एकाच अर्जाद्वारे सर्व योजनांचा लाभ देण्याच्या दृष्टिने एकात्मिक संगणकीय प्रणाली विकसित केलेली आहे. या प्रणालीद्वारे शेतकऱ्यांना त्यांच्या पसंतीच्या बाबींच्या निवडीचे स्वातंत्र्य देण्यात आले असून शेतकऱ्यांनी शेती निगडीत विविध बाबींकरिता अर्ज करावयाचा आहे, इच्छुक शेतकऱ्यांनी  महा डीबीटी पोर्टलवर नाव नोंदणी करण्याचे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांनी केले आहे.                              

याबाबत प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकात म्हटले आहे की, योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकरी बंधुनी आपला वैयक्तिक मोबाईल क्रमांक आपल्या आधार कार्डशी संलग्न करणे आवश्यक आहे. महा-डीबीटी पोर्टलचे https://mahadbtmahait.gov.in/हे संकेतस्थळ आहे. या संकेतस्थळावरील शेतकरी योजना हा पर्याय निवडावा. शेतकरी स्वतःच्या मोबाईल, संगणक,लॅपटॅाप,टॅबलेट, सामुदायिक सेवा केंद्र (CSC), ग्रामपंचायतीतील संग्राम केंद्र इ. माध्यमातून पोर्टलवर जाऊन अर्ज करू शकतील. वैयक्तिक लाभार्थी म्हणून नोंदणी करू इच्छिणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना त्यांचा आधार क्रमांक या संकेतस्थळावर प्रमाणित करून घ्यावा लागेल. ज्या वापरकर्त्याकडे आधार क्रमांक नसेल त्यांनी प्रथम आधार नोंदणी केंद्राकडे जाऊन त्यांची नोंदणी करावी व आपला नोंदणी क्रमांक महा-डीबीटी पोर्टलमध्ये नमूद करून त्यांना योजनांसाठी अर्ज करता येईल. अशा अर्जदारांना अनुदान वितरीत करण्यापूर्वी  महा-डीबीटी पोर्टलमध्ये त्यांना देण्यात येणारा आधार क्रमांक नोंदणीकृत करून प्रमाणित करून घ्यावा लागेल, त्याशिवाय त्यांना अनुदानाचे वितरण करण्यात येणार नाही.

पोर्टलवरील प्राप्त अर्जांची ऑनलाईन लॉटरी, पुर्व संमती देणे तसेच निवड झालेल्या लाभार्थ्याच्या खात्यावर थेट अनुदान वितरण करणे इ. सर्व प्रक्रिया ऑनलाईन होणार आहे.  महाडीबीटी पोर्टलवर माहिती भरण्याची  कार्यवाही सुरु झाली आहे. यापूर्वी ज्यांनी माहिती भरली असेल त्यांनी पुन्हा  भरण्याची आवश्यकता नाही. मात्र लाभाच्या घटकांमध्ये शेतकरी बदल करू शकतात. ज्या शेतकरी बांधवांनी महाडीबीटी पोर्टलवर कृषीविषयक योजनाचा लाभ मिळवण्यासाठी अद्याप अर्ज केला नसेल, त्यांनी  गुरुवार दि.३१ पर्यंत आपले अर्ज पोर्टलवर भरावेत. या तारखेपर्यंत प्राप्त सर्व अर्ज लॉटरीसाठी ग्राह्य धरले जातील. तरी सर्व इच्छुक शेतकऱ्यांनी  महा डीबीटी पोर्टलवर नाव नोंदणी करावी,असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांनी केले आहे. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ