धर्मदाय रक्तपेढ्यांमधुन पिवळी शिधापत्रिकाधारक रुग्णांना मोफत रक्त द्यावे-जिल्हाधिकारी पापळकर यांचे निर्देश

 


अकोला,दि.२४(जिमाका)- शासनाने  सार्वजनिक आरोग्य विभाग व वैद्यकीय शिक्षण विभागाअंतर्गत  वैद्यकीय महाविद्यालये व संलग्न शासकीय रुग्णालयात भरती असलेल्या रुग्णांना रक्त व रक्त घटक मोफत उपलब्ध करुन देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचप्रमाणे धर्मदाय नोंदणीकृत संस्थांकडून चालविल्या जाणाऱ्या रक्तपेढ्यांमधुनही  १० टक्के रक्तपुरवठा  पिवळी शिधापत्रिकाधारक रुग्णांना उपलब्धतेप्रमाणे मोफत द्यावा , असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी आज येथे दिले.

शासनाच्या धोरणानुसार, धर्मदाय रुग्णालयांमध्ये गरीब  व निर्धन रुग्णांसाठी मोफत व सवलतीच्या दरात खाटा राखुन ठेवण्याच्या योजनेच्या अंमलबजावणीबाबत बैठक घेण्यात आली. या बैठकीस जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर तसेच जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, तसेच  धर्मदाय रुग्णालयांचे प्रतिनिधी व रक्तपेढ्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

यावेळी माहिती देण्यात आली की,  होमिओपॅथिक  वैद्यकीय रुग्णालय, अकोट रोड अकोला येथे  एकुण वीस खाटांपैकी दोन (निर्धन रुग्णांसाठी ) दोन (दुर्बल घटकांसाठी), राधाकिसन तोष्णिवाल आयुर्वेद महाविद्यालय केडिया प्लॉट व आयुर्वेदीक रुग्णालय, स्टेशन रोड अकोला यांच्या १०० खाटांपैकी  दहा, दहा, संत तुकाराम हॉस्पिटल ॲण्ड रिसर्च सेंटर तुकाराम चौक यांच्या ५० खाटांपैकी पाच- पाच,  नलिनीताई राऊत आयुर्वेदिक रुग्णालय व डॉ. वंदनाताई  ढोणे आयुर्वेदिक महाविद्यालय, पातुर यांच्या १४८ खाटांपैकी १५-१५,  अकोला नेत्ररुग्णालय व अकोला डायलिसीस सेंटर रामदास पेठ अकोला यांच्या ३० खाटांपैकी तीन- तीन,  दम्माणी नेत्ररुग्णालय, आपातापा रोड अकोला यांच्या २० खाटांपैकी दोन-दोन,  जनता होमिओपॅथिक  मेडिकल कॉलेज व रुग्णालय केडिया प्लॉट यांच्या २० खाटांपैकी दोन- दोन,  डॉ. राजेश आर कांबे डेन्टल  कॉलेज ॲण्ड हॉस्पिटल कान्हेरी सरप यांच्या १०० खाटांपैकी दहा-दहा खाटा राखीव ठेवण्यात आल्या आहेत.

या प्रमाणेच जिल्ह्यातील धर्मदाय रक्तपेढ्यांनीही  निर्धन व गरीब रुग्णांना मोफत व सवलतीच्या दरात रक्तसाठा आवश्यकतेनुसार उपलब्ध करुन द्यावा, अशी सुचना जिल्हाधिकारी पापळकर यांनी केली. त्यानुसार पिवळी शिधापत्रिकाधारक रुग्णांना मोफत  उपलब्ध करुन द्यावा,असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ