ग्रा.पं. निवडणूक 2020-21 उमेदवार, साक्षीदार व निवडणूक कर्मचाऱ्यांच्या कोविड चाचणीचे नियोजन करा जिल्हाधिकारी पापळकर यांचे निर्देश

 



 

अकोला,दि. 17(जिमाका)- जिल्ह्यात होऊ घातलेल्या ग्रामपंचायत निवडणूकांची प्रक्रिया राबवितांना  उमेदवार, नामनिर्देशन पत्र भरतांना त्यांच्या समवेत आलेले साक्षीदार तसेच निवडणूक कर्मचारी यांची कोविड चाचणी करण्याचे नियोजन करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी आज येथे दिले.

ग्रामपंचायत निवडणूकीच्या पार्श्वभुमिवर  जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्था, निवडणूक आदर्श आचारसंहिता अंमलबजावणी व कोविड साथीच्या अनुषंगाने करावयाच्या उपाययोजना याबाबत जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी आढावा घेतला. यावेळी पोलीस अधिक्षक जी. श्रीधर,  निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, उपविभागीय अधिकारी डॉ. निलेश अपार, राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिक्षक स्नेहा सराफ, पोलीस व महसूल विभागाचे अधिकारी आदी उपस्थित होते.

यावेळी बोलतांना जिल्हाधिकारी पापळकर म्हणाले की, जिल्ह्यात होत असलेल्या ग्रामपंचायत निवडणूका या कोविड संसर्गाच्या पार्श्वभुमिवर होत आहेत. त्यामुळे या कालावधीत निवडणूक प्रक्रिया राबवितांना कोविड संसर्गाचा फैलाव रोखण्याबाबतही उपाययोजना करावयाच्या आहेत. त्यासाठी आरोग्य विभागाच्या सहकार्याने नामनिर्देशन पत्र भरतांना उमेदवार, त्यांचे साक्षीदार तसेच  निवडणूक प्रक्रियेत काम करणारे कर्मचारी यांची कोविड चाचणी (RTPCR Rapid Antigen) त्याच ठिकाणी करण्याचे नियोजन करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिले. तसेच कायदा सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने जिल्ह्यातील अवैध मद्य विक्री बाबत प्रतिबंधात्मक कारवाई, निवडणूक असलेल्या ग्रामपंचायत हद्दीतील शस्त्र परवानाधारकांची  शस्त्रे जमा करण्याबाबत कारवाई करणे, हद्दपारीची प्रकरणे निकाली काढणे आदी बाबींवर कारवाई प्रारंभ करावी.  तसेच मतदान केंद्रनिहाय आढावा घेऊन संवेदनशिल मतदान केंद्रांबाबतचा अहवाल तयार करावा आदी निर्देशही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ