जनतेशी थेट संपर्क येणाऱ्या व्यक्तिंची होणार कोविड चाचणी: जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांचे आदेश

 अकोला,दि.2 (जिमाका)-  अनलॉकडाऊन नंतर सर्व प्रतिष्‍ठाने, आस्‍थापना , मनोरंजन केन्‍द्र तसेच व्‍यापारी संकुले सुरु करण्‍यात आली आहेत. त्‍यामुळे अशा गर्दीच्‍या ठिकाणी कोविड-१९ या साथीच्‍या रोगाचा प्रादुर्भाव व फैलाव जास्‍त प्रमाणात होण्‍याची शक्‍यता लक्षात घेता  प्रतिबंधात्‍मक उपाययोजना म्हणून जनतेशी थेट संपर्क येणाऱ्या व्‍यक्‍ती  यांची  प्रत्‍यक्ष  कोविड-१९ ची चाचणी करुन (सुपर स्प्रेडर) पॉझिटीव्‍ह रुग्‍ण शोधण्यासाठी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी आदेश जारी केले आहेत.

                आपत्‍ती व्‍यवस्‍थापन अधिनियम, २००५, भारतीय साथ रोग नियंत्रण अधिनियम, १८९७ अन्‍वये हे आदेश निर्गमित करण्यात आले आहेत. 

सुपर स्प्रेडर म्हणून ज्या घटकांची चाचणी करावयाची आहे त्यात खालील गटांचा प्राधान्याने समावेश करण्यात आला आहे.

त्यात- दिल्‍ली , राजस्‍थान, गुजरात व गोवा या चार राज्‍यातून येणारे प्रवासी, कृषि उत्‍पन्‍न बाजार समिती, धार्मिक स्‍थळे, किराणा दुकानदार, शॉपिंग मॉल, आठवडी बाजार, स्‍वस्‍त धान्‍य दुकानदार, प्रशिक्षण केंद्र, योगा / व्‍यायामशाळा, सिनेमा हॉल/ मनोरंजन केन्‍द्र, भाजीपाला/ फळ  विक्रेते, दुध डेअरी / दुध विक्रेता, तिनचाकी / चार चाकी प्रवासी वाहतुक करणारे चालक, खरेदी विक्रीची नोंदणी कार्यालये, केशकर्तनालय(सलुन), पेट्रोलपंप धारक व कर्मचारी, कापड विक्रेते/ स्वीटमार्ट इ.व्‍यापारी, सर्व मेडीकल स्‍टाफ, सर्व रुग्‍णवाहीकेवरील चालक, जनतेशी वारंवार संपर्कात येणारे शासकीय कार्यालयातील कर्मचारी, वृत्‍तपत्रे विक्रेते, फुटपाथ वरील पानठेले, भेळ, पाणी पुरी विक्रेते, चहाटपरी इ. यांचा समावेश आहे,

या आदेशात, खालील प्रमाणे कार्यान्वयन यंत्रणांनी काम करावे असेही निर्देशित करण्यात आले आहे.

१.      आयुक्‍त, अकोला महानगरपालिका यांनी महानगरपालिका क्षेत्रामध्‍ये कोविड-१९ ची चाचणी करण्‍याचे दृष्‍टीने नियोजन करावे.

२.      उपविभागीय अधिकारी यांनी तालुक्‍यातील  ग्रामीण व नगर परिषद क्षेत्रामध्‍ये मुख्‍याधिकारी यांचे सहायाने सर्व संबंधीत  यंत्रणेशी  समन्‍वय साधुन नियोजन करावे.

३.      उपविभागीय अधिकारी यांनी  प्रत्‍येक तालुक्‍यामध्‍ये कमीत कमी २५०  व्‍यक्‍ती तसेच महानगरपालिका क्षेत्रामध्‍ये दररोज ७१०  या प्रमाणे जिल्‍हयामध्‍ये  ग्रामीण भागामध्‍ये एकूण १७०० व महानगर पालिका क्षेत्रामध्‍ये  ७१० या  प्रमाणे चाचण्‍या होतील या बाबत आवश्‍यक ते नियोजन करावे.   

४.    स्‍वॅब टेस्‍ट करण्‍याकरिता व कॅम्प घेण्‍याकरिता  जिल्‍हा शल्‍य चिकित्‍सक , जिल्‍हा आरोग्‍य अधिकारी यांचेशी संपर्क साधून आवश्‍यक पथके उपलब्‍ध करुन घ्‍यावीत.

५.     ज्‍या दिवशी आठवडी बाजार असतील त्‍या दिवशी मोठया प्रमाणात चाचण्‍या होतील या करिता कॅम्‍पचे आयोजन करावे. 

६.      जिल्‍हा शल्‍य चिकित्‍सक, अकोला यांनी प्राप्‍त झालेल्‍या स्‍वॅबचे नमूने जास्‍तीत जास्‍त तपासल्‍या जातील या बाबत आवश्‍यक ते नियोजन करावे. तसेच  संबंधीत कॅम्‍पचे ठिकाणी पुरेशी आरोग्‍य यंत्रणा उपलब्‍ध करुन देण्‍यात यावी.

७.     आयुक्‍त, अकोला महानगरपालिका व उपविभागीय अधिकारी यांनी केलेले नियोजन व झालेल्‍या टेस्‍टचा प्रगती अहवाल दररोज सादर करावा.

                        यासोबतच

 मनपा आयुक्त व उपविभागीय अधिकारी यांनी आपल्या अधिनस्‍त क्षेत्रामध्‍ये  ILI-SARI रुग्‍णांचे नियमित सर्वेक्षण करावे व अशा सर्व रुग्‍णांची कोविड-१९ चाचणी करावी, प्रत्‍येक Covid-19 Positive  व्‍यक्‍तींचे  Contact Tracing   करुन  High Risk Contacts ची कोविड-१९ ची चाचणी करावी, Containment Zone  मध्‍ये संपूर्ण कालावधीमध्‍ये  घरोघरी भेटीद्वारे सर्वेक्षण करुन तसेच स्‍थानिक वैद्यकिय व्‍यवसायीकाचा मदतीने १०० टक्‍के ILI-SARI रुग्‍णांची नोंद करुन  त्‍यातील प्रत्‍येकाची COVID-19  ची चाचणी करावी, स्‍थानिक स्थितीनुसार आयुक्‍त, अकोला महानगर पालिका व उपविभागीय अधिकारी यांनी आपाल्या कार्यक्षेत्रामध्‍ये  कोविड-१९ नियंत्रणासाठी चाचणी आवश्‍यक असणारे इतर व्‍यक्‍तींची सुद्धा चाचणी करावी, असे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी जारी केले आहेत.           

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

आदर्श आचारसंहिता निवडणूक आचार संहिता म्हणजे काय ?

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना