‘माझी वसुंधरा’ अभियानाच्या जनजागृतीसाठी न.पा. क्षेत्रात दि.१ जानेवारी रोजी सायकल रॅली



अकोला
,दि.२४(जिमाका)- नगरपालिका क्षेत्रात हरित आच्छादन आणि जैवविविधता, घनकचरा व्यवस्थापन, वायू, जलसंवर्धन, अग्नि व आकाश या विविध उपाययोजना राबवून वसुंधरा संवर्धन करणाऱ्या  ‘माझी वसुंधरा’ या अभियानाची  काटेकोर अंमलबजावणी करा, याबाबत जनजागृतीसाठी नववर्षाच्या पहिल्या दिवशी दि.१ जानेवारी  २०२१ रोजी  सायकल रॅलीचे आयोजन करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी आज येथे दिले.

‘माझी वसुंधरा’ या अभियानाबाबत आज जिल्ह्यातील सर्व नगरपरिषद व नगरपंचायत क्षेत्रात होत असलेल्या उपाययोजनांचा व  विविध विकास कामाचा आढावा घेण्यात आला.जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात ही बैठक घेण्यात आली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, जिल्हा नगरपालिका प्रशासन अधिकारी सुप्रिया टवलारे, अकोट मुख्याधिकारी वाहुरवाघ, बार्शिटाकळी मुख्याधिकारी  स्नेहल रहाटे, तेल्हारा मुख्याधिकारी अकोटकर, बाळापूर मुख्याधिकारी पवार, पातूर येथील  सोनाली यादव, नगर प्रशासनचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

या अभियानाचा मुख्य हेतू असलेल्या पर्यावरण संवर्धनाबाबत जनजागृती व्हावी याकरीता शुकवार दि. १ जानेवारी २०२१  रोजी सायकल रॅलीचे आयोजन करावे, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. या अभियानाअंतर्गत प्रत्येक नगरपरिषदेमध्ये उपलब्ध ठिकाणी विविध रोपांची लागवड करुन वसुंधरा गार्डन तयार करणे,  नाविण्यपूर्ण विकास योजना राबविणे, राबविण्यात येणाऱ्या  योजनांचा कृती आराखडा तयार करणे, शहराच्या विविध क्षेत्रात हरितपट्टा निर्माण करणे, घनकचऱ्याचे व्यवस्थापन करणे, भूजल पुनर्भरणसारखे प्रकल्प राबविण्याचे नियोजन  करावे, अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्यात. आपल्या शहराची स्वच्छता राखून पर्यावरण पर्यावरण संवर्धन  करण्याबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करावी,असे निर्देशही यावेळी देण्यात आले.

यावेळी ‘माझी वसुंधरा’ या अभियानाच्या अंलबजावणीच्या अनुषंगाने जिल्ह्यातील नगरपालिका हद्दीत राबवावयाच्या उपक्रमांचा आढावा घेण्यात आला. त्यात आठवड्यातून एक दिवस सायकलवर कार्यालयात येणे,  सौर उर्जेचा वापर वाढविणे, घन कचऱ्याचे व्यवस्थापन करणे इ. उपाययोजनांचा आढावा घेण्यात आला. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ