व्याळा ग्रामपंचायतीचा निवडणूक कार्यक्रम रद्द: सुधारीत प्रभाग रचना करण्याचे निवडणूक आयोगाचे निर्देश

 अकोला,दि.२५(जिमाका)- मा. राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार, व्याळा ता. बाळापूर या ग्रामपंचायतीचा निवडणूक कार्यक्रम रद्द करण्यात आला असून या ग्रामपंचायतीचा सुधारीत कार्यक्रम नंतर जाहीर करण्यात येणार असून राज्य निवडणूक आयोगाने या ग्रामपंचायतीची प्रभाग रचना सुधारीत करण्याबाबत निर्देश दिले आहेत. प्रभाग रचनेचा कार्यक्रमही निवडणूक आयोगामार्फत देण्यात येणार आहे. या निर्देशांनुसार अंमलबजावणीचे आदेश जिल्हाधिकारी अकोला यांनी निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसिलदार बाळापूर यांना दिले आहेत, अशी माहिती जिल्हा प्रशासनातर्फे निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी दिली आहे.

 यासंदर्भात जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त माहितीनुसार, मा.राज्‍य निवडणुक आयोगाच्या दिनांक २९ नोव्हेंबर २०१९ च्‍या आदेशान्‍वये माहे जुलै २०२० ते डिसेंबर २०२० या कालावधीत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींच्‍या सार्वत्रिक निवडणुकीकरिता प्रभाग रचना व आरक्षणाचा कार्यक्रम दिला होता. कोविड-१९ च्‍या पार्श्‍वभुमीवर दि. १७ मार्च २०२० च्‍या आदेशान्‍वये हा  कार्यक्रम स्‍थगित करण्‍यात आला होता.  त्‍यानंतर आयोगाने दि.२०ऑक्टोबर २०२० रोजी सुधारित प्रभाग रचना व आरक्षण कार्यक्रम दिला.  त्‍यानुसार अकोला जिल्ह्यातील व्‍याळा ता.बाळापुर जि.अकोला या ग्रामपंचायतीच्‍या प्रभाग रचना व आरक्षणाचा कार्यक्रम राबविण्‍यात येवुन दि. २ नोव्हेंबर २०२० रोजी अंतिम प्रभाग रचना प्रसिद्ध केली. त्यानंतर मतदार यादीच्या कार्यक्रमानुसार अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्‍यात आली.

तथापि, लोकसंख्‍येच्‍या प्रमाणात प्रभागाची व लोकसंख्‍येची विभागणी आणि आरक्षणाची विभागणी करावयास पाहिजे होती. परंतु त्‍या पद्धतीची झालेली दिसत नसल्‍याबाबत उत्‍तम गोविंदराव म्‍हैसने, मु.पो. व्‍याळा ता.बाळापूर जि. अकोला  यांनी मा. उच्‍च न्‍यायालय मुंबई खंडपीठ नागपूर येथे रिट याचीका क्रमांक ३५३६/२०२० दाखल केली होती. या याचिकेच्या सुनावणीनंतर दि. १८ डिसेंबर २०२० रोजी आदेश पारीत करण्‍यात आला असून त्यात अर्जदार यांनी सक्षम अधिकारी यांच्‍याकडे अर्ज सादर करावे असे आदेशित केले होते. त्‍यानुसार अर्जदार यांनी राज्य निवडणूक आयोग व जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयात अर्ज सादर केला.

यासंदर्भात मा. उच्‍च न्‍यायालयाचे आदेशानुसार मा.राज्‍य निवडणुक आयोगास सविस्‍तर अहवाल सादर करुन मार्गदर्शन मा‍गविले असता, त्यांनी, व्‍याळा ग्रामपंचायतीची प्रभाग रचना सदोष असुन ती रद्द करणे आवश्‍यक असल्‍यामुळे अशा प्रभाग रचनेवर निवडणुक घेतल्‍यास ती लोकहिताच्‍या दृष्‍टीने अयोग्‍य असेल म्‍हणुन मा. आयोगाने  गुरुवार दि.२४ डिसेंबर २०२० रोजीच्या आदेशान्‍वये व्‍याळा ग्रामपंचायतीच्‍या निवडणुकीचे आतापर्यंत पार पाडण्‍यात आलेले सर्व टप्‍पे रद्द  करुन नियमानुसार नव्‍याने प्रभाग रचना करण्‍याबाबत निर्देश दिले आहेत.

त्‍यानुसार व्‍याळा ग्रामपंचायतीची महाराष्‍ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ च्‍या कलम १० मधील तरतुदीनुसार नव्‍याने प्रभाग रचना करण्‍याकरिता मा.आयोगाकडुन स्‍वतंत्रपणे कार्यक्रम देण्‍यात येईल. त्‍यामुळे मा. राज्‍य निवडणुक आयोगाचे दि. ११ डिसेंबर २०२० रोजीचे निवडणुक कार्यक्रमानुसार पार  पडणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकांसोबत व्‍याळा ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणुक होणार नसुन या निवडणुकीचा कार्यक्रम मा.आयोगाकडुन स्‍वतंत्रपणे निर्गमित करण्‍यात येईल.  त्‍याअनुषंगाने मा.राज्‍य निवडणुक आयोगाने दिलेल्‍या निर्देशानुसार पुढील कार्यवाही करण्‍याबाबत जिल्‍हाधिकारी अकोला यांनी तहसिलदार तथा निवडणुक अधिकारी बाळापुर यांना निर्देश दिले आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ