ग्रामपंचायत निवडणूक: नामनिर्देशन पत्रे व जात पडताळणी प्रस्ताव ‘ऑफलाईन’ पद्धतीने स्विकारणार

 अकोला,दि. २९(जिमाका)-ग्रामपंचायत निवडणूकीची नामनिर्देशन पत्रे  ऑनलाईन पद्धतीने सादर करतांना  तांत्रिक अडचणी, इंटरनेटचा वेग कमी असणे, सर्व्हर डाऊन होणे अशा तक्रारी येत असल्याने नामनिर्देशनपत्रे पारंपारिक पद्धतीने म्हणजेच ‘ऑफलाईन’ पद्धतीने स्विकारण्याचा निर्णय राज्य निवडणूक आयोगाने घेतला आहे. तसेच नामनिर्देशन पत्रे स्विकारण्यासाठी दि.३० रोजी सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत वेळ वाढविण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिली आहे. त्याच प्रमाणे जात वैधता पडताळणी प्रस्तावही ऑफलाईन पद्धतीने स्विकारण्यात येणार आहेत असे कळविण्यात  आले  आहे.

या संदर्भात  दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की,  राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार  जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणूक कार्यक्रम राबविण्यात येत आहे. दि.२३ पासून नामनिर्देश पत्रे ऑनलाईन पद्धतीने स्विकारण्यात येत आहेत.  मात्र दि.२८ रोजी सायंकाळ पासून तांत्रिक अडचणी  निर्माण होत होत्या. त्याबाबतच्या तक्रारी आयोगाला प्राप्त होत होत्या. ही बाब विचारात घेता आयोगाने  इच्छुक उमेदवार नामनिर्देशनापासूच वंचित राहू नये व त्यांना निवडणूक लढण्याची संधी मिळावी यासाठी ऑफलाईन पद्धतीने म्हणजेच पारंपारिक पद्धतीने नामनिर्देशन स्विकारण्याचा निर्णय घेतला आहे. त्या सोबतच नामनिर्देशन दाखल करण्याची वेळ दि.३० रोजी  सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत वाढविण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे.

यासंदर्भात सर्व निवडणूक निर्णय अधिकारी यांनी तातडीने पारंपारिक पद्धतीने  नामनिर्देशन पत्र स्विकारणे व वाढीव वेळेबाबतच्या सुचना द्याव्यात. तसेच नामनिर्देशन पत्र व घोषणापत्राचे कोरे नमुने  इच्छुक उमेदवारांना उपलब्ध करुन द्यावे. असे पारंपारिक पद्धतीने  स्विकारलेले नामनिर्देशन पत्र संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी यांनी छाननी प्रक्रिया पूर्ण झाल्यावर वैध नामनिर्देशन पत्रे संगणक चालकांच्या मदतीने  संगणल प्रणाली मध्ये आर.ओ. लॉगिन मधून भरुन घ्यावे,असे निर्देश जिल्हाधिकारी पापळकर यांनी दिले आहेत.

जात वैधता प्रस्तावही  ऑफलाईन स्विकारणार

 ग्रामपंचायतीच्या  अनुषंगाने जात वैधता प्रमाणपत्र  प्रस्ताव दाखल केल्याची पावती आवश्यक असल्याने  व अर्जदारांची गैरसोय होऊ नये  यासाठी दि.३० रोजी जात वैधता प्रस्ताव हे ऑनलाईन व ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने  स्विकारण्याचे निर्देश  प्रकल्प संचालक (सीव्हिसी)  पुणे यांनी  दिले आहेत, त्या अनुषंगाने  जात पडताळणी प्रस्ताव स्विकारण्याबाबत  जात पडताळणी समितीचे अध्यक्ष अकोला यांना निर्देशाबाबत कळविण्यात आले असल्याची माहिती  निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी दिली आहे. दरम्यान  ग्रामपंचायत निवडणूकांच्या अनुषंगाने ऑफलाईन प्रस्ताव  स्विकारण्यात येतील असे उपायुक्त तथा सदस्य  जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती अकोला यांनी कळविले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ