स्व.डॅडी देशमुख जयंती समारोह व पुरस्कार वितरण सोहळा: पालकमंत्री ना. बच्चू कडू यांच्या हस्ते ज्येष्ठ रंगकर्मी अरुण घाटोळ सन्मानित

 अकोला,दि.२७(जिमाका)- स्व. बाबुराव साहेबराव उपाख्य डॅडी देशमुख जयंती समारोह व पुरस्कार वितरण सोहळा आज येथे पार पडलायावेळी ज्येष्ठ रंगकर्मी अरुण घाटोळ यांना डॅडी देशमुख स्मृती जीवन गौरव पुरस्काराने राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, शालेय शिक्षण, महिला व बालविकास, इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक  मागास प्रवर्ग, विमुक्त जाती भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, कामगार राज्यमंत्री  तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांच्या हस्ते  सन्मानित करण्यात आले.

हॉटेल सेंटर प्लाझा येथे पार पडलेल्या या कार्यक्रमास अकोल्याचे पालकमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांच्या समवेत विधान परिषद सदस्य आ. अमोल मिटकरी, महापौर अर्चनाताई मसने, माजी आमदार तुकाराम बीडकर, बल्लूभाऊ जवंजाळ, प्रा.डॉ.संतोष हुसे तसेच संयोजन समितीचे प्रा.मधु जाधव, संजय खडपकर, सदाशिव शेळके, अशोक रहाटे, प्रशांत देशमुख तसेच देशमुख परिवारातील सदस्य उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महापौर अर्चनाताई मसने या होत्या.  उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करुन भाऊसाहेब पंजाबराव देशमुख, डॅडी देशमुख यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. तसेच डॅडी देशमुख यांच्या कार्याचा परिचय करुन देणारा माहितीपटही दाखवण्यात आला.

 यावेळी  आ.अमोल मिटकरी म्हणाले की, कला क्षेत्रात युवक युवतींनी पुढे यावे. जिल्ह्यातील सांस्कृतिक चळवळीला उत्तेजन मिळावे, अशी अपेक्षा त्यांनी  व्यक्त केली. नव्या  जोमाच्या तरुण तरुणींनी अकोल्याचा कला सांस्कृतिक क्षेत्रात नाव लौकिक व्हावा, हे डॅडी देशमुखांचे स्वप्न पूर्ण करावे, असं आवाहन केलं.

सन्मानार्थी  अरुण घाटोळे यांनी सत्काराला उत्तर दिले. ते म्हणाले की, रंगभूमी ही माणसाला वास्तविक माणूस म्हणूनच दाखवते. माणसाला माणूस म्हणून दाखवणाऱ्या या वास्तव माध्यमातच मी काम केले. नाटकातून समाजातील विविध प्रश्नांवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला. या पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.

 या कार्यक्रमाच्या निमित्ताने रंगभूमी परिनिरीक्षण मंडळ सदस्य रमेश थोरात, माहिती पट निर्माते डॉ. राजेश देशमुख, सौंदर्य स्पर्धा विजेती कु.पूजा विष्णू मुळे यांचा सत्कार उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. अध्यक्षीय समारोपात महापौर मसने यांनी शहरातील सांस्कृतिक चळवळीला उत्तेजन देण्यासाठी सहयोग देऊ, असे सांगितले.

            कार्यक्रमाचे प्रास्ताविक तुकाराम बीडकर यांनी केले. प्रा. मधु जाधव यांनी ज्येष्ठ रंगकर्मी अरुण घाटोळे यांच्या कार्याचा परिचय करून दिला. सूत्रसंचालन किशोर बळी यांनी केले.आभार प्रदर्शन सदाशिव शेळके यांनी केले. या सोहळ्याला शहरातील कलारसिक तसेच नाट्य व चित्रपट क्षेत्रातील व्यक्ती उपस्थित होत्या.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ