सेंद्रिय शेती खरेदी व विक्री महामंडळ मर्या.नावाने पदे भरतीची फसवी जाहिरात, सावधानतेचा इशारा

 

           अकोला,दि.४ (जिमाका)- सेंद्रिय शेती खरेदी व विक्री महामंडळ मर्या.’ या नावे सुक्ष्म, लघु व मध्यम उद्यम मंत्रालय यांचेकडे नोंदणी असलेल्या संस्थेद्वारे राज्यस्तरावरुन मोठ्या प्रमाणावर विविध पदे भरतीबाबत जाहिरात प्रसिद्ध झाली असून जाहिराती मध्ये दिलेल्या तपशीलावरुन ही जाहिरात फसवी असून राज्यातील सुशिक्षित तरुणांना प्रलोभन दाखवून त्यांची फसवणुक होण्याची शक्यता आहे,असे कृषि आयुक्तालय पुणे यांनी कळविले आहे.

            यासंदर्भात प्रसिद्धीस दिलेल्या माहितीनुसार,  याबाबत कृषि आयुक्तालयास तक्रार प्राप्त झाली आहे. या तक्रारीच्या अनुषंगाने जाहिरातीमध्ये दर्शविलेल्या भ्रमणध्वनी क्रमांकावर संबंधितांशी कृषि आयुक्तालयस्तरावरुन  संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, संबंधित व्यक्तिस सेंद्रिय शेती खरेदी व विक्री महामंडळ मर्या' बाबत विचारण्यात आलेल्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे देता आली नाहीत. तसेच महामंडळाचा स्थायी पत्ता व इतर माहिती विचारली असता संबंधित व्यक्तिने फोन वरील संभाषण मध्येच बंद करुन फोन बंद केला. त्यानंतरही त्यांनी सर्व फोन बंद करुन ठेवलेले असल्याने त्यांचेशी संपर्क होऊ शकत नाही. तसेच त्यांना ईमेलव्दारे माहिती विचारण्यात आली असून अद्याप ईमेलला देखील उत्तर दिलेले नाही.

           संबंधीत संस्थेच्या जाहिरातीत अथवा संकेतस्थळावर मुख्यालयाचा पत्ता नाही. जाहिरातीमध्ये एकूण ६७८१३ पदांची भरती करणार असल्याचे प्रलोभन दाखविण्यात आलेले असून अर्ज भरणेकरिता शुल्क देखील आकारण्यात आले आहे. सर्व पदांचे वर्षाचे फक्त मानधनच रु. ९७५ कोटी एवढे होते. सेंद्रिय शेतमालाची खरेदी व विक्री करण्यासाठी एवढा मानधनावर खर्च करणे निश्चितच व्यवहारिकदृष्टया संयुक्तिक नाही. त्यामुळे राज्यातील बेरोजगार तरुणांची मोठ्या प्रमाणावर आर्थिक फसवणुक होण्याची शक्यता नाकारता येत नाही.  या ‘सेंद्रिय शेती खरेदी व विक्री महामंडळ मर्या’ या संस्थेचा आणि केंद्र/राज्य शासनाचा अथवा शासन अंगीकृत महामंडळांशी कोणताही संबंध नाही. तरी अश्या फसव्या जाहिरातीस तरुणांनी बळी पडू नये, असे आवाहन कृषि आयुक्तालयामार्फत करण्यात आले आहे.

डॉ. पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशनचे ही आवाहन

याच संदर्भात अकोला येथिल डॉ. पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशन व मिशनशी संबंधित सर्व संस्थांचा कोणताही संबंध नाही, असे डॉ. पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशनचे प्रकल्प संचालक यांनी कळविले आहे. ‘सेंद्रिय उत्पादने खरेदी व विक्री महामंडळ’व्दारा विविध पदांकरीता भरती प्रक्रियेची जाहिरात  वृत्तपत्रात प्रसिद्ध करण्यात आली आहे.  या  पदभरतीच्या जाहिरातीशी  शासन निर्णय क्रंमाक जैशेमी १०१८/प्र.क्र.१२५/१७- अ दिनांक १६/१०/२०१८ अन्वये स्थापित झालेल्या डॉ.पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशन, अकोला व मिशनची संलग्नीत असलेल्या सर्व संस्था यांचा कुठलाही संबंध नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

आदर्श आचारसंहिता निवडणूक आचार संहिता म्हणजे काय ?

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना