कोरोना संसर्गाचा फैलाव रोखणे ही प्रत्येकाची जबाबदारी-डॉ.सुभाष सोळुंखे:राज्य टास्क फोर्सच्या प्रतिनिधींनी घेतला जिल्हा प्रशासनाचा आढावा






 अकोला,दि.१८ (जिमाका)-जिल्ह्यात होत असलेली कोरोना रुग्णसंख्येतील वाढ व रुग्ण संख्या वाढीचा दर ही चिंतेची बाब आहे. कोरोना संसर्गाचा हा फैलाव रोखणे ही  प्रशासकीय यंत्रणेसोबतच लोकप्रतिनिधी व लोकांची अशी प्रत्येकाची जबाबदारी आहे. त्यादृष्टीने सर्व घटकांनी खबरदारी घ्यावी,असे निर्देश राज्य कोविड टास्क फोर्सचे प्रतिनिधी डॉ. सुभाष सोळुंखे यांनी दिले.

राज्य कोविड टास्क फोर्सचे प्रतिनिधी डॉ. सुभाष सोळुंखे यांनी आज जिल्हा प्रशासनातर्फे कोरोनाचा वाढलेला फैलाव रोखण्यासाठी केलेल्या उपाययोजनांचा आढावा घेतला. जिल्हा नियोजन भवनात पार पडलेल्या या बैठकीस जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर,मनपा आयुक्त निमा अरोरा, पोलीस अधिक्षक जी. श्रीधर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश आसोले, प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी मुकेश चव्हाण, प्रांताधिकारी डॉ. निलेश अपार, मनपा आरोग्य अधिकारी डॉ. फारुख शेख तसेच विविध यंत्रणांचे प्रमुख उपस्थित होते.

यावेळी डॉ. सोळुंखे यांनी जिल्हा प्रशासनाने राबविलेल्या उपाययोजनांचा आढावा घेतला. त्याबद्दल जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी सादरीकरणाद्वारे माहिती दिली व जिल्ह्यातील कोरोना फैलावाच्या सद्यस्थितीबाबत अवगत केले.

त्यात माहिती देण्यात आली की, जिल्ह्यात प्रतिबंधात्मक उपाययोजना कडक करण्यात आल्या असून त्यासाठी विविध आदेश निर्गमित करण्यात आले आहे. गर्दी होणारी संभाव्य ठिकाणांवर गर्दी होऊ नये यासाठी उपाययोजना. विवाह समारंभ अन्य समारंभांबाबत दिशा निर्देश जारी करुन त्याचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध धडक कारवाई  करण्यात येत आहेत. मास्क न घालणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यासाठी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. ग्रामिण भागात प्राथमिक आरोग्य केंद्रस्तरावर दररोज एक हजार जणांच्या चाचण्या करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. प्रत्येक रविवारी संपूर्ण संचारबंदी तसेच रात्रीची संचारबंदी आदी उपाययोजना करण्यात आले असल्याची  माहिती देण्यात आली.

            आपल्या संबोधनात डॉ. सोळुंखे म्हणाले की, कोरोनाचा हा फैलाव रोखण्यासाठी प्रशासन प्रयत्न करीत आहेच. तथापि प्रशासनाने घालुन दिलेल्या निर्बंधांचे पालन करणे हे लोकांचे कर्तव्य आहे. ही एकट्या प्रशासनाची जबाबदारी नसून लोक व लोकप्रतिनिधी यांचीही जबाबदारी आहे. ते पुढे म्हणाले की, जर येत्या आठ दिवसात वाढत्या संसर्गाला अटकाव करता आला नाही तर  संपुर्ण लॉकडाऊनचा पर्याय अवलंबावा लागेल. होम आयसोलेशन मध्ये असलेले रुग्ण बाहेर दिसले तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करा. प्रत्येक खाजगी डॉक्टरांनी त्यांच्याकडील तापाच्या रुग्णांची  माहिती  प्रशासनाकडे देणे बंधनकारक असून त्यांनीही याबाबत दक्षता घ्यावी असे डॉ. सोळुंखे यांनी सांगितले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ