कालवडी ता. अकोट येथील मृत पक्षांचा अहवाल निगेटिव्ह चार ठिकाणच्या अधिसुचनांचे आदेश रद्द
अकोला,दि. 11
(जिमाका)- कालवडी ता. अकोट येथील पोल्ट्री फार्ममधील मृत पक्षांचे
अहवाल एच5एन1 करिता निगेटिव्ह आले आहे. तसेच अकोट जवळील खाजगी पाळलेल्या पक्षांचे,
रामापूर येथे आढळलेल्या मृत मोराचा अहवालही निगेटिव्ह आला असल्याची माहिती पशुसंवर्धन
उपायुक्त डॉ. तुषार बावने यांनी दिली आहे. दरम्यान निगेटिव्ह आल्यामुळे बर्ड
फ्ल्यु संदर्भात जारी करण्यात आलेल्या चार अधिसूचनांचे आदेश रद्द करण्यात आले
असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
या संदर्भात पशुसंवर्धन विभागाकडून देण्यात
आलेल्या माहितीनुसार नियमित रोग निदान सर्वेक्षणा अंतर्गत 352 नमूने पाठविण्यात
आले आहेत. रोगनिदानाकरिता पाठविलेल्या मृत 13 कुक्कूट पक्षांपैकी पिंपळगाव चांभारे
ता. बार्शिटाकळी व कुरणखेड ता. अकोला येथील नमुने एच5एन1 करिता पॉझिटिव्ह आले. दोन्ही ठिकाणी केंद्र
शासनाच्या सूचनेप्रमाणे विविध ऑपरेशन पशुसंवर्धन विभागातर्फे पूर्ण करण्यात आले आहे.
पिंपळगाव चांभारे येथील कुक्कूट पालकांना नूकसान भरपाई देण्यात आलेली आहे.
अकोट तालुक्यामधील ग्राम कालवडी जवळील
कुक्कूट फार्म मधील 2435 पक्षी मृत पावले होते त्या कुक्कूट फार्म मधील मृत पक्षांचे
अहवाल एच5एन1 करिता निगेटिव्ह आले आहेत. त्याचप्रमाणे अकोट जवळील परसातील कुक्कूट
फार्म मधील 108 पक्षी मृत पावले होते. त्याचा देखील अहवाल निगेटिव्ह आला आहे.
त्याचप्रमाणे रामापूर येथील शेतशिवारामधे मृत पावलेल्या मोराचा पण अहवाल एच5एन1
करिता निगेटिव्ह आला आहे.
जंगली व इतर पक्षी व कावळे यांचे आतापर्यंत
17 नमुने पुणे येथे पाठवले असून त्यांचा अहवाल अजून प्रतिक्षेत आहे. आतापर्यंत एकूण
15 अधिसूचना बर्ड फ्ल्यु संदर्भात काढण्यात आल्या होत्या त्यापैकी चार अधिसूचनाचे
आदेश रद्द करण्यात आले आहेत. त्यात अकोट, कालवडी
ता. अकोट, रामापूर ता. अकोट व चाचोडी ता. अकोला या क्षेत्राचा समावेश आहे अशी
माहिती देण्यात आली.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा