खरीप हंगामः८७ टक्के क्षेत्रावर पेरणी;आंतरमशागतीला वेग


अकोला,दि.२०(जिमाका)- यंदाच्या खरीप हंगामात अद्याप एकूण पर्जन्यमानाच्या ७२ टक्के पर्जन्यमान नोंदविण्यात आले आहे. खरीप हंगामासाठी लागवडीचे क्षेत्र हे सरासरी ४ लक्ष ८० हजार ५८६ हेक्टर इतके असते त्यापैकी अद्याप ४ लक्ष १९ हजार ६१७ हेक्टरवर  पेरण्या आटोपल्या आहेत.  एकूण सरासरीशी हे प्रमाण ८७ टक्के इतके आहे. यात कपाशी व सोयाबीन या पिकांखाली सर्वाधिक क्षेत्र आहे.जुलै व ऑगस्ट महिन्यात झालेल्या पावसामुळे पिकांची स्थिती समाधानकारक असल्याने शेतकऱ्यांनी आंतरमशागतीच्या कामांना वेग दिला आहे.
यासंदर्भात कृषि विभागाकडून प्राप्त प्राप्त आकडेवारीनुसार, जिल्ह्यात खरीप हंगामात सरासरी ४ लाख ८० हजार ५८६ हेक्टर क्षेत्रावर पेरणी होत असते. यंदाच्या वर्षी ४ लाख ८० हजार हेक्टर इतक्या क्षेत्रावर पेरणीचे लक्ष्य खरीप हंगामासाठी ठेवण्यात आले. आज अखेर झालेल्या पिक पेरा नोंदीनुसार, जिल्ह्यात ४ लक्ष १९ हजार ६१७ हेक्टर म्हणजे ८७ टक्के क्षेत्रावर पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. जिल्ह्यात सर्वाधिक पेरणी क्षेत्र हे कपाशी व सोयाबीन या पिकांखाली असते.  तथापि कपाशीची पेरणी १०० टक्के तर सोयाबीनची पेरणी सरासरी क्षेत्राच्या ८४ टक्के इतकी झाली आहे.
पिकनिहाय पेरणी झालेले क्षेत्र याप्रमाणे-
तृणधान्य पिकांखाली जिल्ह्यात २१ हजार ९०० हेक्टर इतके लक्ष होते. त्यापैकी १०००१.४ हेक्टर म्हणजेच एकूण सरासरीच्या ४३ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. तृणधान्य पिकांत सर्वाधिक क्षेत्र हे ज्वारी पिकाखाली असते ते १८ हजार ६०० हेक्टर असून त्यापैकी ९ हजार ७१३.१३ हेक्टर क्षेत्रावर लागवड पूर्ण झाली आहे. मका पिकाखाली ५०० हेक्टर क्षेत्राचे लक्ष्य होते त्यापैकी २४२.८ हेक्टर क्षेत्रावर लागवड झाली आहे. तथापि एकूण सरासरी क्षेत्राच्या (१७१ हेक्टर) १४२ टक्के पेरणी झाली आहे.
कडधान्य पिकांखाली एकूण सरासरी १ लक्ष ८११ हेक्टर इतके क्षेत्र असते, यंदा कडधान्य लागवडीसाठी १ लक्ष २४ हजार १०० हेक्टर इतके लक्ष्य ठरविण्यात आले. त्यापैकी ८७ हजार ६५६.४ हेक्टर इतक्या क्षेत्रावर कडधान्य पिकांची लागवड झाली असूण एकूण सरासरीच्या ८७ टक्के क्षेत्रावर ही लागवड झाली आहे. कडधान्य पिकात खरिपात प्रामुख्याने  तूर लागवड केली जाते. यंदा तूर लागवडीखाली ५८ हजार ३०० हेक्टरचे लक्ष्य असून ५३ हजार ५१२.७ हेक्टरवर तूर लागवड झाली असून एकूण सरासरी क्षेत्राच्या ९१ टक्के इतके हे प्रमाण आहे. तसेच उडीद पिकाखाली २५ हजार २०० हेक्टर क्षेत्रावर लागवडीचे लक्ष्य असून त्यापैकी १४ हजार ६८ हेक्टर क्षेत्रावर लागवड झाली आहे. तथापि  सरसरीच्या (११ हजार ९७८ हेक्टर) ११७ टक्के क्षेत्रावर लागवड झाली आहे.
एकूण खरिपासाठी अन्नधान्य पिकांखाली १ लक्ष ४६ हजार हेक्टर इतके लक्ष ठरविण्यात आले असून  त्यापैकी ९७ हजार ६५७.८ हेक्टर इतकी पेरणी झाली आहे. एकूण सरासरीच्या हे प्रमाण ७९ टक्के इतके आहे.
तेलबियांच्या पिकांमध्ये एकूण लक्ष्य १ लक्ष ६९ हजार हेक्टर इतक्या क्षेत्रावर पेरणीचे असून त्यापैकी १ लक्ष ७० हजार २०९ हेक्टर क्षेत्रावर पेरण्या आटोपल्या आहेत. तथापि, तेलबिया पिकांखाली असणाऱ्या क्षेत्राची सरासरी ही २ लक्ष ४हजार १७३ हेक्टर इतकी असून त्यापैकी ८३ टक्के इतकी पेरणी झाली आहे. यात महत्त्वाचे पिक म्हणजे सोयाबीनचे क्षेत्र सरासरी २ लक्ष ३ हजार ५ हेक्टर इतके असून १ लक्ष ६५ हजार हेक्टर इतके लक्ष्य ठरविण्यात आले होते. त्यापैकी प्रत्यक्षात १ लक्ष ६९ हजार ८६५ हेक्टर इतक्या क्षेत्रावर पेरणी झाली असून एकूण सरासरी क्षेत्राशी हे प्रमाण ८४ टक्के आहे. कापूस हे जिल्ह्यातील महत्त्वाचे नगदी पिक असून  कपाशीचे सरासरी क्षेत्र १ लक्ष ५२ हजार ३५३ हेक्टर इतके आहे. यंदा १ लक्ष ६५ हजार हेक्टर क्षेत्रावर कपाशी लागवडीचे उद्दिष्ट्य ठरविण्यात आले होते. प्रत्यक्षात १ लक्ष ५१ हजार ७४७ हेक्टर क्षेत्रावर कपाशीची लागवड झाली असून ही एकूण सरासरीच्या जवळपास १०० टक्के इतकी झाली आहे.
पेरणीबाबत परिणाम करणारा महत्त्वाचा घटक म्हणजे पाऊस. जिल्ह्याचे सरासरी पर्जन्यमान हे ६९७.३ मि.मी इतके असून यंदा आजअखेर (मंगळवार दि.२०पर्यंत) ५०६.९० मि.मी इतक्या पावसाची नोंद झाली आहे. हे प्रमाण एकूण सरासरी पर्जन्यमानाशी ७२.७० टक्के इतके आहे.
दरम्यान जुलै अखेर व ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या-दुसऱ्या आठवड्यात चांगला पाऊस झाल्याने पिकांची स्थिती आता जोमदार आहे. त्यामुळे शेतकरी वर्गात आंतरमशागतीची कामे उरकण्यासाठी लगबग सुरु आहे. यात शेतकऱ्यांनी डवरणी, खत देणे, निंदणी आदी कामांना प्राधान्य दिले आहे.
पिकांची स्थिती समाधानकारक
जिल्ह्यातील पिकांची पेरणी ही एकूण सरासरीच्या ८७ टक्के क्षेत्रावर असून अपेक्षित सर्व पेरणी आटोपली आहे. जिल्ह्यातील सर्वच पिकांची स्थिती समाधानकारक आहे, अशी माहिती जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी मोहन वाघ यांनी दिली. कपाशीचे पिक वाढीच्या अवस्थेत आहे. सोयाबीन पिक फुले येण्याच्या स्थितीत आहे. तूर पिक फांद्या वाढीच्या अवस्थेत आहे. ज्वारी पिकही फलधारणेच्या अवस्थेत आहे. जिल्ह्यातील तुरळक अपवाद वगळता कुठेही किड व रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत नाही. ढगाळ हवामान व आर्द्रता यामुळे काही ठिकाणी पिकांवर किडीचा प्रादुर्भाव होऊ शकतो मात्र हवामानात बदल होताच स्थिती सुधारेल. कृषी विभाग पिक स्थितीवर लक्ष ठेवून आहे. हवामानातील प्रतिकूल बदलामुळे प्रादुर्भाव वाढल्यास शेतकऱ्यांनी प्रवाही किटकनाशकांचा वापर करावा, असे आवाहन वाघ यांनी केले आहे.  मात्र सद्यस्थितीत पिकांची स्थिती उत्तम आहे, असेही जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी यांनी स्पष्ट केले आहे. फवारणीची वेळ आल्यास शेतकऱ्यांनी किटकनाशक फवारणीच्या वेळी खबरदारी घ्यावी, असे आवाहनही करण्यात आले आहे.
किटकनाशके फवारतांना घ्यावयाची काळजीः-
गळके फवारणी यंत्र न वापरता ते दुरूस्त करून वापरावे, किटकनाशके फवारणी यंत्रात भरतांना सांडू नये यासाठी नरसाळयाच्या वापर  करावा., तणनाशक फवारणीसाठी वेगळा पंप वापरावा व तो पंप किटकनाशक फवारणीसाठी वापरू नये, किटकनाशक वापरतांना संरक्षक कपडे वापरावे, फवारणीसाठी वापरलेले सर्व साहित्य पाण्याने स्वच्छ धुऊन ठेवावे,  झिजलेले, खराब झालेले नोझल्स बदलून  घ्यावेत, किटकनाशकला  हुंगणे किंवा  त्याचा  वास घेणे टाळावे. , फवारणीचे मिश्रण हाताने न ढवळता लांब लाकडी दांडयाचा  किंवा काठीचा वापर करावा,किटकनाशक पोटात जाण्याची शक्यता असल्याने फवारणीचे मिश्रण  करतांना अथवा  फवारणीच्यावेळी तंबाखू खाणे अथवा  धुम्रपान करणे टाळावे, फवारणीचे काम पुर्ण झाल्यानंतर  हात साबणाने स्वच्छ धुऊन खाणे, पिणे करावे, फवारणीच्यावेळी लहान मुले, जनावरे पाळीव प्राणी यांना त्या ठिकाणापासुन  दुर ठेवावे, उपाशी पोटी फवारणीन करता  फवारणीपुर्वी न्याहरी करावी, फवारणी करतांना वापरलेली  भांडी इ. साहित्य  नदी, नाला किंवा विहीरीजवळ धुउू नयेत. तर धुतांना वापरलेले पाणी त्यात विषारी अवशेष असल्याने पडीक जमिनीत टाकावेत अथवा मातीत गाडावेत,किटकनाशकांच्या रिकाम्या बाटल्या वापरानंतर  नष्ट करून टाकाव्यात, फवारणी करतांना नोझल बंद पडल्यास ते स्वच्छ करण्यासाठी त्यास तोंड लावून फुंकू नये अथवा हवा तोंडाने आत ओढू नये. त्यासाठी सोईस्कर तार, काडी किंवा टाचणी वापरावी, किटकनाशके फवारणीचे काम आठ तासांपेक्षा जास्तवेळ करू नये. हे काम करणाऱ्या प्रत्येक  व्यक्तीने  ठराविक कालावधीने डॉक्टरांकडून स्वत:ला तपासून घ्यावे, फवारणी करतांना वापरण्याचे कपडे स्वतंत्र ठेवावे व वेळोवेळी स्वच्छ धुवावे., वाऱ्याच्या विरूध्द दिशेने फवारणी करून नये, किटकनाशके फवारलेल्या क्षेत्रावर गुरांना किमान दोन आठवडे  चरण्यास जाऊ देऊ नये, जमिनीवर सांडलेले किटकनाशक माती /चिखल यांच्या सहाय्याने शोषून  घ्यावेत, डब्यांवरील मार्गदर्शक   चिन्हांकडे काळजीपुर्वक  लक्ष द्यावे. लाल रंगाचे चिन्ह/खुण असलेली  औषधी सर्वांत अधिक विषारी असून त्यानंतर पिवळा , निळा व हिरवा असा क्रम लागतो.
विषबाधा झाल्याची लक्षणे व उपाय योजना-विषबाधा हि किटकनाशके / तणनाशके यांच्या त्वचेशी संपर्क अथवा पोटात गेल्यास होते.  विषबाधा व इतर आजार  यांचा लक्षणात बरेचदा साम्य राहु शकते.
लक्षणे-अशक्तपणा व चक्कर येणे, त्वेचेची जळजळ होणे,  डाग पडणे, घाम येणे, डोळयांची  जळजळ होणे, पाणी येणे,  अंधुक दिसणे, तोंडातुन  लाळ गळणे,  तोंडाची  आग होणे, उलटी येणे, मळमळणे,  हगवण होणे, पोटात दुखणे.,  डोळेदुखी, अस्वस्थ होणे, स्नायुदुखी  , जीभ लूळी पडणे, बेशुध्द होणे, धाप लागणे, छातीत दुखणे , खोकला येणे.
डॉक्टरांना माहिती द्या-रोग्याचा किटकनाशकांसह संपर्क आला होता काय?नेमके कोणते किटकनाशक वापरले? शरीरात किती गेले व केव्हा गेले?याबाबत डॉक्टरांना माहिती द्या. वैद्यकीय उपचाराची दिशा ठरविण्यासाठी ही माहिती महत्वाची असते.
विषबाधेनंतर तातडीने करावयाचे प्रथमोपचार- किटकनाशके/तणनाशके डोळ्यात उडाल्यास, तात्काळ डोळे स्वच्छ पाण्याने 5 मिनीटांपर्यंत पाण्याची  धार सोडून धुवा. शरीरावर उडाले असल्यास 10 मिनिटे साबणाने स्वच्छ  धुवा व  दवाखान्यात न्या. विषबाधेनंतर रोगी जर संपुर्ण शुद्धीवर असेल  तरच त्याला उलटी करण्यास प्रवृत्त करा अन्यथा नाही.तीन चमचे बारीक लाकडी कोळसा भुकटी करुन अर्धा ग्लास पाण्यातुन पाजा व लगेच दवाखान्यात न्या, विषारी  औषध कपड्यांवर उडाले असल्यास ते कपडे लगेच बदला व रोग्यास शक्य तितक्या  लवकर दवाखान्यात पोहचवा.
   ०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ