विक्रेत्यांमार्फत शेतकऱ्यांना ‘सेफ्टी किट’विनामूल्य उपलब्धता व्हावी-जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी वाघ


            अकोला,दि.28(जिमाका)- जिल्ह्यात शेतकऱ्यांना फवारणीसाठी किटकनाशके विक्री करतांना उत्पादक कंपन्यांनी विक्रेत्यांमार्फत सुरक्षा संच अर्थात ‘सेफ्टी किट’ विनामूल्य उपलब्ध करुन द्यावे, असे निर्देश जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी मोहन वाघ यांनी आज येथे किटकनाशक उत्पादकांना व यंत्रणेला दिले. तसेच प्रतिबंधित किटकनाशके विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर कडक कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
येथील नियोजन सभागृहात आज जिल्ह्यातील किटकनाशक विक्रेते व उत्पादक यांच्यासाठी विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेस अपर जिल्हाधिकारी  नरेंद्र लोणकर, डॉ.पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठाचे  विस्तार संचालक डॉ. डी.एम.मानकर, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी मोहन वाघ, डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठाचे रोगशास्त्र व किटकशास्त्र विभागाचे शास्त्रज्ञ डॉ. लांडे, डॉ. कुलकर्णी, जिल्हा गुणनियंत्रण अधिकारी नितीन लोखंडे, कृषि विकास अधिकारी  डॉ. इंगोले आणि कृषि सेवा केंद्र संघटनेचे अध्यक्ष मानकर उपस्थित होते.
जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या किटकनाशक फवारणी करतांना  होत असलेल्या विषबाधेच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभुमिवर या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यात रासायनिक खते, बियाणे , ठिबक, तुषारसंच विक्रेते, कृषि यंत्र सामुग्री विक्रेते आदी सहभागी झाले होते. यावेळी माहिती देण्यात आली की, जिल्ह्यात शेतकरी विषबाधेच्या सर्वाधिक घटना या मोनोक्रोटोफॉस या औषधाच्या फवारणी वेळी झालेल्या आहेत. या किटकनाशकाची विक्री विक्रेत्यांनी करु नये, अशा सुचना यावेळी देण्यात आल्या. पिक वाढीसाठी करण्यात येणाऱ्या संप्रेरकांच्या फवारणीसोबत काही जण किटकनाशकांची फवारणी करतात त्यामुळे या घटना घडत असल्याचे निदर्शनास आले आहे. तसेच तणनाशके फवारण्याचा पंप शेतकऱ्यांनी किटकनाशकांच्या फवारणीसाठी वापरु नये असेही यावेळी सांगण्यात आले.  विक्रेते व कृषि विभाग हे संयुक्तपणे शेतकऱ्यांना फवारणीबाबत मार्गदर्शन करणार आहेत.
  डॉ. मानकर यांनी यावेळी मार्गदर्शन केले की, विद्यापीठाने शिफारस केलेल्या किटकनाशकांचाच फवारणीसाठी वापर करावा व पिकांची अवस्था, किडीमुळे होणाऱ्या नुकसानीची तीव्रता याचा विचार करुनच किटकनाशक विक्रेत्यांनी शेतकऱ्यांना किटकनाशक वापराबाबत सुचना करावी. याबाबत कृषि विभाग मार्गदर्शक तक्तेही उपलब्ध करुन देत आहे, असे डॉ. मानकर यांनी सांगितले. किटकशास्त्रज्ञ डॉ. लांडे व डॉ. कुलकर्णी यांनी उपस्थितांना किडीच्या अवस्था व त्यावर वापरावयाची किटकनाशकांची मात्रा याबाबत तांत्रिक मार्गदर्शन केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ