शांतता कमिटी बैठक: गणेशोत्सव शांतता,उत्साहात व पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करा पालकमंत्री ना. डॉ. रणजीत पाटील


 अकोला,दि.१९(जिमाका)-  आगामी गणेशोत्सवात सर्व स्तरातील समाज घटकांनी सौहार्दपणे सहभागी होऊन शांतता व उत्साहाच्या वातावरणात व पर्यावरणपूरक साजरा करावा असे आवाहन राज्याचे गृह(शहरे), विधी व न्यायविभाग, संसदीय कार्य, माजी सैनिकांचे कल्याण, कौशल्य विकास आणि उद्योजकता विभागांचे राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी आज येथे केले. तसेच या उत्सवासाठी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना लागणाऱ्या विविध परवानग्यांसाठी एक खिडकी सुविधा उपलब्ध करावी,असे निर्देशही ना. डॉ. पाटील यांनी जिल्हा प्रशासनाला दिले.
आगामी गणेशोत्सवासंदर्भात आज जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा शांतता कमिटीची बैठक पार पडली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील हे उपस्थित होते. या बैठकीस जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, पोलीस अधिक्षक अमोघ गावकर, मनपा आयुक्त संजय कापडणीस, अपर पोलीस अधिक्षक विक्रांत देशमुख तसेच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ समितीचे अध्यक्ष ॲड. मोतीसिंग मोहटा तसेच अन्य सदस्य उपस्थित होते.
 यावेळी आगामी गणेशोत्सवा संदर्भात प्रशासनाने केलेल्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यात आला.  तसेच गणेशमूर्ती विक्रीचे नियोजन, गणेश आगमन व विसर्जन मिरवणूक मार्ग रहदारी व्यवस्थापन, गणेश मूर्ती उंची, उच्च ध्वनी मर्यादा पालन याबाबत काटेकोरपालन करावे, असे आवाहन पालकमंत्र्यांनी केले. जिल्हाधिकारी पापळकर यांनी जिल्हा प्रशासनातर्फे आदर्श गणेशोत्सव मंडळाला प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात येईल, असे सांगितले. तसेच ध्वनी पातळी मोजण्यासाठी ध्वनी मोजणी यंत्र प्रत्येक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना उपलब्ध केले जाईल, असे सांगितले. स्थापना ते विसर्जन या कालावधीत गणेश मंडळांना कोणतीही अडचण येणार नाही यासाठी पोलीस विभाग सज्ज व दक्ष आहे, असेही सांगण्यात आले. गणेशोत्सव शांतता व सौहार्दाच्या वातावरणात पार पाडावा व त्यासाठी सर्व मंडळांनी प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले.
 महानगरपालिकेतर्फे घरगुती गणेश विसर्जनासाठी चार ठिकाणी गणेश घाटांची निर्मिती केली जाईल, असेही सांगण्यात आले. यावेळी झालेल्या चर्चेत मंडळांचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भाग घेतला.
गेल्या वर्षी गणेशोत्स्व सजावट स्पर्धेतील विजेत्यांना पालकमंत्री डॉ. पाटील यांच्या हस्ते गौरविण्यात आले. त्यात सिंध गणेशोत्सव मंडळ, खदान, टिव्हीस शोरुम जवळील गणेशोत्सव मंडळ, विश्वकर्मा गणेशोत्सव मंडळ, राजेश्वर गणेशोत्सव मंडळ व जनता बॅंक गणेशोत्सव मंडळ यांचा समावेश होता.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ