जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत माहिती पोहोचवा- जिल्हाधिकारी पापळकर


अकोला,दि.31(जिमाका)- किटकनाशक फवारणी संदर्भात सुरक्षा उपाययोजनांबाबत जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत माहिती पोहोचवा, असे निर्देश आज जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी येथे दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात किटकनाशक विषबाधा प्रकरणी संबंधित विभागांची आढावा बैठक पार पडली. यावेळी  निवासी उपजिल्हाधिकारी राम लठाड, जिल्हा शासकीय रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. कुसुमाकर घोरपडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी मोहन वाघ, जिल्हा कृषि विकास अधिकारी डॉ. मुरली इंगळे, प्रताप रणखांब तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
 यावेळी जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी वाघ यांनी माहिती दिली की, जिल्ह्यात शेतकऱ्यांमध्ये जनजागृतीसाठी कृषि विभागामार्फत प्रयत्न होत आहेत. त्या अंतर्गत जनजागृती मोहिम राबविण्यात येत असून  आतापर्यंत शासनामार्फत प्रत्येक आरोग्य केंद्रात आयोजित  आरोग्य तपासणी शिबिरात 220 शेतकरी- शेतमजूरांची वैद्यकीय तपासणी पूर्ण झाली आहे.  तसेच जिल्ह्यात किटकनाशक  उत्पादक- वितरकांमार्फत 8 हजार सुरक्षा किट वाटप करण्यात आले आहे. जिल्ह्यात एकूण 50 हजार सुरक्षा किट वाटपाचे उद्दिष्ट्य ठरविण्यात आले आहे. 10 हजार पोस्टर्स, बॅनर्सच्या माध्यमातून ग्रामपंचायत व गर्दीच्या ठिकाणी माहिती प्रसारित करण्यात आली आहे. आठ ठिकाणी प्रबोधन शिबिरे घेण्यात आली. त्याद्वारे दोन हजार शेतकऱ्यांचे प्रबोधन करण्यात आले.
जिल्हाधिकारी स्वतः फवारणी प्रात्यक्षिकात सहभागी
आज सकाळी भौरद ता. अकोला येथे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी स्वतः फवारणी प्रात्यक्षिकात सहभाग घेऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. त्यांनी स्वतः सुरक्षा किट वापरुन शेतकऱ्यांना फवारणी करुन दाखविली. यावेळी त्यांचे समवेत जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी मोहन वाघ व अन्य कृषि विभागाचे अधिकारी- कर्मचारी तसेच ग्रामस्थ, शेतकरी उपस्थित होते.
विषबाधा उपचारासंदर्भात डॉक्टर्सची कार्यशाळा
दरम्यान, किटकनाशक विषबाधा प्रकरणी जिल्ह्यातील वैद्यकीय अधिकारी व खाजगी डॉक्टर्ससाठी प्रशिक्षण कार्यक्रमही आयोजित करण्यात आला आहे.  त्यानुसार येत्या सोमवार दि.9 सप्टेंबर रोजी  जिल्ह्यातील आरोग्य अधिकारी, खाजगी डॉक्टर्स, वैद्यकीय अधिकारी यांच्या साठी विषबाधा उपचार याविषयी कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. तर मंगळवार दि.17 सप्टेंबर रोजी  जिल्ह्यातील आरोग्य अधिकारी तसेच विभागातील आरोग्य अधिकाऱ्यांसाठी कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. या कार्यशाळांचे नियोजन करण्याच्या सुचना यावेळी  जिल्हा शल्य चिकित्सक व अधिष्ठाता यांना देण्यात आल्या.
जिल्हा प्रशासन यासंदर्भात जनजागृतीपर उपक्रमांवर अधिक भर देत असून जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत किटकनाशक फवारणी व त्यासाठी घ्यावयाची खबरदारी याबाबतची माहिती पोहोचवा,असे आवाहन जिल्हाधिकारी पापळकर यांनी केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ