राष्ट्रीय ग्रामस्वराज अभियान:ग्रामविकासाच्या नियोजनात रोजगारनिर्मितीस प्राधान्य आवश्यक मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद


अकोला,दि.२२ (जिमाका)- ग्राम विकासाचे नियोजन  करतांना गावातील प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक समाज घटकाचा सहभाग त्यात असणे गरजेचे आहे. हे नियोजन करतांना गावातील लोकांसाठी रोजगारनिर्मितीला चालना मिळून व्यक्तीचे व गावाचे उत्पन्न वाढण्याच्या दिशेने ते व्हावे, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ)आयुष प्रसाद यांनी आज येथे केले.
            राष्ट्रीय ग्रामस्वराज अभियान अंतर्गत ‘आमचं गाव आमचा विकास’ उपक्रमाअंतर्गत  ग्रामपंचायत विकास आराखडा तयार करण्यात येणार आहे. त्यासाठी आज  जिल्हास्तरीय प्रशिक्षण व कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेच्या उद्घाटन सत्रात मार्गदर्शन करतांना सीईओ आयुष प्रसाद हे सहभागी झालेल्या अधिकाऱ्यांशी संवाद साधत होते. यावेळी  उपमुख्य कार्यकारी अधिकारी विलास खिल्लारे, संदीप भंडारे, राजीव फडके गटविकास अधिकारी  राहुल शेळके, कार्यशाळेचे साधन व्यक्ती गणेश कुटे व ॲड अनिता गुरव तसेच सर्व गटविकास अधिकारी व जिल्हास्तरीय अधिकारी सहभागी झाले होते.
आपल्या संबोधनात सीईओ आयुष प्रसाद म्हणाले की, या अभियानात गावाच्या विकासाचे नियोजन हे गावानेच करावयाचे आहे. त्यासाठी लोकांचा सहभाग आवश्यक आहे.  विकासाचे नियोजन करतांना त्यात समाजातील सर्व व्यक्ती व गटांचा सहभाग असावा हा यामागील उद्देश आहे. हे नियोजन करतांना गावातील लोकांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण होऊन त्यांच्या आर्थिक उत्पन्नात वाढ होऊन त्यांचे जीवनमान उंचवावे हे अपेक्षित आहे. त्यामुळे हे नियोजन करतांना त्यातून रोजगारनिर्मितीस प्राधान्य असणे आवश्यक आहे. ते पुढे म्हणाले की, हे नियोजन करतांना त्यात गावातील लोकांचे शिक्षण आरोग्य आणि उपजिविका साधन निर्मिती याबाबींकडे लक्ष द्यावे.
दिवसभर चाललेल्या या कार्यशाळेत जिल्ह्यातील विभागप्रमुख सहभागी झाले होते.
‘आमचा गाव आमचा विकास’
हा उपक्रम  गावविकासासाठी ग्रामपंचायतींचा सन २०२०-२१ ते २०२४-२५ या वर्षांसाठी  विकास आराखडा तयार करण्यात येणार आहे. हा पंचवार्षिक विकास आराखडा तयार करतांना  सन २०२०-२१ चा वार्षिक आराखडा अंतिम करावयाचा आहे. त्यासाठी प्राधान्यक्रम ठरवून देण्यात आला आहे. त्यात गेल्या तीन वर्षात  केलेली कामे,  ग्रामपंचायत विकास आराखडे,  प्रत्यक्षात प्राप्त निधी, हाती घेतलेली कामे, पूर्ण व अपूर्ण कामे, झालेला खर्च शिल्लक निधी याबाबींनुसार चर्चा करुन नियोजन करावे. तसेच शिक्षण आरोग्य व पशुसंवर्धन यासंदर्भातही नियोजन करावयाचे आहे. आराखडा अंतिम करतांना  महिला बालकल्याण साठी १० टक्के, अनुसूचित जाती जमाती  कल्याणासाठी लोकसंख्येच्या प्रमाणात, तसेच आरोग्य,शिक्षण, उपजिविका यासाठी २५ टक्के याप्रमाणे निधीची तरतूद करणे आवश्यक आहे. विशेष म्हणजे हा आराखडा तयार करतांना एकूण आराखड्याच्या १० टक्क्यांपेक्षा अधिक  निधी वैयक्तिक लाभाच्या उपक्रमांवर खर्च करु नये, अशाही मार्गदर्शक सुचना आहेत.
या उपक्रमात विना निधी अथवा कमी खर्चात निव्वळ लोकसहभागातून कामे करावयाची आहेत. त्यात  १०० टक्के लसीकरण, स्वच्छ व कचरा विरहित ग्रामपंचायत याबाबत जाणीव जागृती,  शाळा अंगणवाडीत १०० टक्के पटनोंदणी व उपस्थिती,  गावातील सर्व क्षेत्र पिकाखाली आणणे,  शोष खड्डे व परसबागांचा वापर करुन  गावातील सांडपाण्याचे व्यवस्थापन करणे, स्वच्छतागृह व शौचालय वापराबाबत जागृती,  कुपोषण मुक्त गाव, बालमजूर मुक्त गाव, तंटामुक्त व व्यसनमुक्त गाव, प्लास्टीकमुक्त गाव आदी उपक्रमही राबवावयाचे आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ