आपोती येथील वक्राकार बंधाऱ्यात साठले पाणी: पाणी वापराच्या नियोजनात गावकऱ्यांचा सहभाग आवश्यक- जिल्हाधिकारी पापळकर यांचे पाहणी प्रसंगी ग्रामस्थांना आवाहन


अकोला, दि.१४ (जिमाका)- आपोती गावाजवळ आलेले वक्राकार बंधाऱ्यातील पाणी वापराबाबत योग्य नियोजन करणे आवश्यक आहे. त्यासाठी शेतकरी मंडळांनी पुढाकार घेऊन विविध मार्गांनी पाण्याची बचत करुन पाणी जपून वापरावे. पाणी वापराच्या नियोजनात गावकऱ्यांचा सहभाग आवश्यक आहे, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी आज आपोती येथील ग्रामस्थांना केले.
आपोती खु. येथील नाल्यावर वक्राकार बंधारा व पूल या ठिकाणी पावसामुळे जमा झालेल्या  जलसाठ्याची पाहणी आज जिल्हाधिकारी पापळकर व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी केली. यावेळी मान्यवरांच्या हस्ते जलपूजनही करण्यात आले. त्यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला.
आज सकाळी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी या कामाची पाहणी केली. या पाहणी प्रसंगी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद,  मुख्य अभियंता जलतारे, कार्यकारी अभियंता गिरीश जोशी,  जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी मोहन वाघ, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अजय मालोकार, श्यामराव पाटील आपोतीकर, आशिष आपोतीकर,  उपसरपंच उमेश बोबटे, आशाताई मालीवाल, श्रीकांत पडगीलवार, उदय वझे तसेच परिसरातील ग्रामस्थ शेतकरी, शेतकरी मंडळांचे सभासद, पदाधिकारी उपस्थित होते.
असा आहे बंधारा- आपोती गावाच्या जवळ नाल्यावर हा वक्राकार बंधारा कम ब्रीज बांधण्यात आला आहे. आता या बंधाऱ्यात पाणी साठले आहे.  एकूण १८ मीटर लांबीचा हा बंधारा असून  ६ मिटर व्यासाचे तीन अर्धवर्तुळाकार बंधारे या ठिकाणी उभारण्यात आले आहे.  बंधाऱ्यांची उंची २.४ मिटर इतकी असून त्याची किंमत १५ लक्ष इतकी आहे. याबंधाऱ्याची साठवणूक क्षमता ४ कोटी लिटर आहे. सध्या हा बंधारा पूर्ण भरला आहे.
आता हे पाणी  लिफ्ट करुन जवळच्या गाव तलावांत तसेच शेततलावात टाकून पिण्यासाठी व पिकांसाठी वापरण्याचे नियोजन करण्यात येणार आहे. त्यासाठी सौर पंपाच्या सहाय्याने पाईपलाईनद्वारे हे पाणी तलावापर्यंत नेण्यात येईल.  पाण्याच्या नियोजनामुळे या भागातील पाणी समस्या निवारणास मदत होणार आहे.
यावेळी ग्रामस्थ-शेतकऱ्यांशी संवाद साधतांना जिल्हाधिकारी पापळकर म्हणाले की, तयार झालेल्या जलसाठ्याचे संरक्षण करणे आपले साऱ्यांचे काम आहे. त्यासाठी नाल्याच्या दोन्ही काठाने गवत लागवड करुन मातीची धूप थांबविणे आवश्यक आहे. हे काम गावकरी मिळून महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेतून करु शकता. तसेच निर्माण झालेल्या जलसाठ्यात इच्छुक ग्रामस्थांनी मत्स्य पालन करुन मत्स्य शेतीतून रोजगार मिळवावा.  जवळच्या तलावात नाल्याच्या जलसाठ्यातील पाणी सौर पंपाच्या सहाय्याने लिफ्ट करुन टाकणे. साठवलेले पाणी हे आरओ फिल्टर सुविधा निर्माण करुन  पिण्याचे शुद्ध पाणी ग्रामस्थांना उपलब्ध करण्यात येईल. ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात येणार असली तरी तिची देखभाल व संचलन हे ग्रामस्थांना मिळून करावयाचे आहे. तसेच शेतीसाठी हे पाणी पंपाद्वारे सामुहिक शेततळ्यात सोडण्यात येईल, तथापि हे पाणी शेतात वापरतांना शेतकऱ्यांनी ठिबक संच सारख्या सिंचन पद्धतीचा अवलंब करुन पाण्याची बचत करावयाची आहे. तसेच शेततळ्यातील पाण्याचे बाष्पीभवन रोखण्यासाठी शेततळ्याच्या चहूबाजूने बांबू लागवड करावयाची आहे. यासाऱ्या उपाययोजना करण्यासाठी ग्रामस्थांनी एकोप्याने काम करावे, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी केले.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद म्हणाले की, गावाची एकजूट ही सर्वात मोठी शक्ती आहे. शासनाने उभारुन दिलेल्या पायाभुत सुविधांची मालकी व जबाबदारी ही गावकऱ्यांनी घ्यावी, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
 कार्यक्रमाचे प्रास्ताविक  श्यामराव आपोतीकर यांनी केले. कार्यक्रमाला परिसरातील शेतकरी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ