कावड यात्रा मार्गाची पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांचेकडून पाहणी ; कावड यात्रा मार्गावर भक्तांसाठी सोयीसुविधाची पूर्तता करा - डॉ. रणजित पाटील यांचे निर्देश





अकोला,दि.10(जिमाका):- अकोल्याचे आराध्य दैवत असलेल्या राजराजेश्वराच्या मंदीरात महादेवाच्या पिंडीवर  श्रावण महिन्याच्या शेवटच्या सोमवारी शिवभक्त गांधीग्राम येथून पूर्णा नदीचे जल कावडीने आणून जलाभिषेक  करतात. या कावड यात्रा मार्गाची पाहणी राज्याचे गृह(शहरे), विधी व न्यायविभाग, संसदीय कार्य, माजी सैनिकांचे कल्याण, कौशल्य विकास आणि उद्योजकता विभागांचे राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ.रणजित पाटील यांनी केली .यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, राष्ट्रीय महामार्गाचे अभियंता देवेंद्र अडसूळ ,श्री साठे ,सार्वजनिक बांधकाम विभागाचे  अभियंता श्रीराम पटोकार, मनपा अभियंता श्री गुर्जर तसेच विविध शिवभक्त मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते .
अकोला ते गांधीग्राम पर्यंत राष्ट्रीय महामार्ग मध्ये चार ठिकाणी असलेले वळण रस्ते पूर्ण करावे तसेच शिवभक्तांसाठी अनवाणी चालू शकेल अशाप्रकारे रस्त्यांची डागडुजी करावी .रस्त्यातील खड्डे पूर्णपणे बुजविण्यात यावेत .सार्वजनिक बांधकाम विभागाने गांधीग्राम येथे पूर्णा नदीच्या पात्रात असलेल्या पायऱ्यांची डागदूजी करावी. मनपा विभागाने गांधीग्राम येथे नदीच्या काठावर लावून प्रकाश व्यवस्था करावी .जिल्हा प्रशासनाने पूर्णा नदीच्या काठावर गांधीग्राम येथे आपत्ती व्यवस्थापन पथकाची नेमणूक करावी तसेच पोलिस विभागाने या कालावधीत पुरेसा बंदोबस्त ठेवावा आदी सूचना पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी दिल्या.
 शिवभक्तांना कावड व पालखी मार्ग चालण्यासाठी सुकर व्हावा  तसेच कावड यात्रा मार्गावर भक्तांसाठी सोयी सुविधांची पूर्तता करावी असे निर्देश पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी दिले. शांततेची परंपरा कायम ठेऊन कावड यात्रा उत्सव आनंदाने साजरा करावा असे आवाहन पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी केले.
                                                   00000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ