पुरग्रस्तांसाठी मदत गोळा करण्याआधी पूर्वसुचना आवश्यक


अकोला,दि.28(जिमाका)- महाराष्ट्रातील सांगली,कोल्हापुर,सातारा व इतर जिल्ह्यांमध्ये आलेल्या महापुरामुळे बाधित पुरग्रस्तांसाठी मदत/वर्गणी गोळा करणाऱ्या मंडळांनी महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम 1950 चे कलम 41- क अन्वये विहीत नमुन्यात धर्मदाय उपायुक्तांना पुर्वसुचना देणे आवश्यक असून तसा अर्ज त्यांनी धर्मदाय उपायुक्तांच्या कार्यालयात द्यावा. अशा मंडळांना/ संस्थांना धर्मादाय उपआयुक्त किंवा सहाय्य्क धर्मादाय आयुक्त यांनी चौकशी केल्यानंतर अटी/शर्तींच्याधीन राहुन दाखला देण्यात येईल. तसेच पुरग्रस्तांसाठी गोळा केलेल्या वस्तु/ रक्कमेची योग्य व गरजुंना मदत मिळणेकरीता सर्व मंडळांनी त्या वस्तु व रक्कमेचे वितरण जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत अथवा त्यांनी नेमलेल्या अधिकाऱ्याच्या समन्वयाने किंवा निरीक्षणाखाली करावे, असे आवाहन धर्मदाय उपायुक्त अकोला यांनी केले आहे.
संबधित मंडळांनी माहिती/ पुर्वसुचना देतांना सर्व सदस्यांच्या सहीचा ठराव असावा (हस्तलिखीत प्रत),पदाधिकाऱ्यांचे/सदस्यांचे ओळखपत्राची प्रत सोबत जोडावी. (फोटो आयडीची प्रत ओळख पटण्याजोगी असावी) जसे की, आधार कार्ड, पॅन कार्ड, वाहन परवाना कागदपत्राच्या प्रती जमा कराव्या.
संबधित मंडळांकडुन सुचना प्राप्त झाल्यास त्यांना महाराष्ट्र सार्वजनिक विश्व़स्त़ व्यवस्था अधिनियमातील कलम 41 क चे उपकलम 3 नुसार सुचना प्राप्त झाल्यापासुन 15 दिवसाचे आत दाखला देण्यात येईल. परंतु मदत/ रक्कम गोळा करण्यामध्ये काही फसवणुक वा अपव्यय होण्याबाबत शंका असल्यास धर्मादाय उपआयुक्त व सहाय्यक धर्मादाय आयुक्त त्यांना तशी मदत/ रक्कम  गोळा न करण्याचे आदेश देतील आणि हिशोबपत्रके सादर करुन उर्वरीत रक्कम पिटीए फंडामध्ये जमा करण्याचे आदेश देण्यात येतील, असेही पत्रकात नमुद करण्यात आले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ