प्राथमिक शिक्षकांच्या समस्या सोडविण्यासाठी स्वतंत्र मंच: पालकमंत्र्यांच्या सहविचार सभेचे फलित


अकोला,दि.२६(जिमाका)- जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांच्या विविध सेवा विषयक, व्यक्तिगत समस्या सोडविण्यासाठी जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या अखत्यारीत स्वतंत्र मंच कार्यान्वित करण्यात येईल,असा निर्णय घेण्यात येत असल्याचे राज्याचे गृह(शहरे), विधी व न्यायविभाग, संसदीय कार्य, माजी सैनिकांचे कल्याण, कौशल्य विकास आणि उद्योजकता विभागांचे राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना.डॉ.रणजित पाटील यांनी आज येथे सांगितले.
येथील नियोजन सभागृहात आज शिक्षण क्षेत्रातील विविध समस्यांच्या सोडवणुकीसाठी सहविचार सभेचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, उपसंचालक शेंदोरे, सहसंचालक काळे, शिक्षणाधिकारी(माध्य)प्रकाश मुकुंद, आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी प्र. या.हिवाळे, लेखा व वित्त अधिकारी मानमोडे, डाएट प्राचार्य डॉ समाधान डुकरे आदी अधिकारी व शिक्षक, शिक्षिका उपस्थित होते.
यावेळी पालकमंत्री डॉ.पाटील यांनी उपस्थित शिक्षकांना सांगितले की, प्राथमिक शिक्षकांचे सेवा व अन्य विषयांशी संबंधित प्रश्नांचे प्रमाण पाहता त्यासाठी जिल्हा परिषदेत स्वतंत्र मंच स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच दि.२ ते ९ सप्टेंबर दरम्यान उभा समस्यांच्या निपटाऱ्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येईल.या बाबत ३० सप्टेंबर रोजी विशेष सभा बोलावण्यात येईल.आस्थापना विषयक प्रश्नांसंदर्भात सामान्य प्रशासन शाखेच्या उप मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली स्वतंत्र समिती तयार करण्यात येईल. तसेच जिल्ह्यातील शिक्षकांनाओळखपत्र देण्याचा निर्णय झाल्याचे पालकमंत्री डॉ.पाटील यांनी सांगितले. यावर्षी जिल्हा परिषद शाळांच्या दुरुस्ती साठी ११ कोटी रुपयांचा निधी जिल्हा नियोजन समितीमार्फत उपलब्ध करून दिला असल्याचे पालकमंत्र्यांनी जाहीर करताच, उपस्थित शिक्षकांनी टाळ्यांचा कडकडाट केला.यावेळी पालकमंत्र्यांनी शिक्षकांना त्यांच्या गटनिहाय बोलावून त्यांची निवेदने स्विकारले. त्यानंतर व्यक्तिगत निवेदनेही स्विकारले. प्रकाश अंधारे यांनी सहविचार सभेचे संचलन केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ