अडकलेल्या परप्रांतियांना आहे तेथेच थांबण्याचे आदेश- निवास, भोजन, उपचार सुविधा पुरविणार


अकोला,दि.२९ (जिमाका)-  कोरोना विषाणू संसर्ग प्रादुर्भावाच्या पार्श्वभुमिवर जिल्ह्यात जे परप्रांतीय मजूर, कामगार, कर्मचारी आदी अडकून पडले असतील त्यांनी आपल्या गावी परतण्याचा प्रयत्न करु नये, ते जेथे आहेत तेथेच त्यांनी थांबावे त्यांच्यासाठी आश्रय,भोजन व आवश्यकता भासल्यास  वैद्यकीय उपचार इ. सर्व सुविधा स्थानिक प्रशानाने पुरवाव्या, त्यासाठी सेवाभावी संस्थांची मदत घ्यावी असे आदेश आज जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी निर्गमित केले आहेत.
या आदेशान्वये जिल्ह्यातील महानगरपालिका, सर्व उपविभागीय अधिकारी, तहसिलदार यांनी आपापल्या भागात लॉकडाऊन मुळे अडकून पडलेल्या  गरीब व गरजू लोकांसाठी आश्रयस्थानांची व्यवस्था करावी. त्यांच्या जेवणासाठी सेवा भावी संस्थांमार्फत व्यवस्था करावी. या सर्व लोकांची स्थानिक वैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत  आरोग्य विषयक तपासण्या करुन त्यांना तेथेच अलगीकरण करुन ठेवावे, असे निर्देश देण्यात आले आहेत.
घरमालकांसाठीही निर्देश
याशिवाय ज्या ज्या ठिकाणी असे लोक किंवा कामगार हे भाड्याने दिलेल्या निवासस्थानी रहात असतील, अशा घरमालकांनी  या लोकांना आपल्या जागेतून बाहेर पडण्यास सांगू नये, घर रिकामे करण्यास भाग पाडू नये. तसेच त्यांच्याकडे घरभाड्याची मागणी ही किमान महिनाभरासाठी करु नये, असे आदेशही देण्यात आले आहेत. या आदेशाचे उल्लंघन झाल्यास संबंधितांविरुद्ध कायदेशीर कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे.
सेवाभावी संस्थांनी संपर्क साधावा
परप्रांतीय मजूर व अडकलेले लोक यांच्या निवास, भोजन या व्यवस्थेत ज्या सेवाभावी संस्था योगदान देऊ इच्छितात त्या संस्थांनी आपापल्या भागातील उपविभागीय अधिकारी यांच्याकडे संपर्क साधावा, असे आवाहन ही करण्यात आले आहे.
जिल्ह्यात आजमितीस ७४६ परप्रांतीय
दरम्यान जिल्ह्यात आजमितीस ७४६ परप्रांतीय मजूर, कामगार, कर्मचारी लॉकडाऊन मुळे अडकले असल्याची माहिती प्रशासनाकडे आली आहे.  त्यात अकोला तालुक्यात २७०, बार्शी टाकळी येथे ११, अकोट येथे २८३, तेल्हारा येथे ३२, बाळापूर येथे ४१,  पातुर येथे ७१, मुर्तिजापूर येथे ३८ असे एकूण ७४६ मजूर आहेत. याट सर्वाधिक म्हणजे ३५३ मजूर हे मध्यप्रदेशातील आहेत, तर २०१ तेलंगाणातील आहेत. या शिवाय गुजरात, राजस्थान, केरळ इ. राज्यातीलही मजूर आहेत, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी दिली आहे. जिल्ह्यातील ज्या ज्या भागात असे मजुर, कामगार असतील त्यांनी तात्काळ स्थानिक प्रशासनाकडे आपली माहिती द्यावी, असे आवाहनही करण्यात आले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ