प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना:असंघटीत कामगारांनी सहभागी व्हावे- जिल्हाधिकारी पापळकर


अकोला,दि.१२ (जिमाका)-  विविध क्षेत्रातील असंघटीत कामगारांना वयाच्या ६० वर्षानंतर निवृत्ती वेतन देण्यासाठी प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना असून सध्या कोणत्याही पेन्शन योजनेत समाविष्ट नसणाऱ्या १८ ते ४० वयोगटातील विविध क्षेत्रातील असंघटीत कामगारांनी या योजनेत सहभागी व्हावे,असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले आहे. तसेच विविध क्षेत्रातील कामगारांना या योजनेत सहभागासाठी शासनाच्या विविध विभागांनी कामगारांपर्यंत योजनेची माहिती पोहोचवावी,असे निर्देशही यंत्रणांना दिले.
यासंदर्भात आज जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.  यावेळी असंघटीत क्षेत्रातील कामगारांसाठी असणाऱ्या प्रधानमंत्री श्रमयोगी  मानधन योजना व लघु व्यापाऱ्यांसाठी  राष्ट्रीय निवृत्ती योजना यांचा आढावा घेण्यात आला. याबैठकीस जिल्हाधिकाऱ्यांसमवेत मनपा आयुक्त संजय कापडणीस, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद जिचकार,  सहाय्यक आयुक्त अन्न व औषध प्रशासन  हेमंत मेटकर,  कार्यकारी अभियंता एस.जी. धिवरे,  सहाय्यक कामगार आयुक्त  राजेंद्र गुल्हाणे तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
या योजनेचे उद्दिष्ट श्रमिक, कामगारांना आपल्या वृद्धापकाळात सन्मानाने पेन्शन मिळावी हे असून त्यासाठी १८ ते ४० वयोगटातील कामगारांनी आपली नोंदणी आपले सरकार सेवा केंद्रात करुन बचत करावयाची आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी  महानगरपालिका, नगरपालिका.,पंचायत समिती, जिल्हा परिषद तसेच शासनाच्या विविध विभागांशी संलग्न काम करणारे असंघटीत कामगारांना यात सहभागी करावे, त्यासाठी संबंधित विभागांनी पुढाकार घ्यावा. तसेच लघु व्यावसायिकांपर्यंतही या योजनेची माहिती पोहोचवून त्यांना सहभागी करुन घ्यावे, अशा सुचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या. योजनेची माहिती ग्रामपंचायत स्तरापर्यंत पोहोचविण्यासाठी व्यापक मोहिम राबवावी असेही त्यांनी सांगितले. जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका, आशा स्वयंसेविका, महिला बचत गटाच्या सदस्या, तसेच स्थानिक स्वराज्य संस्था, शासनाच्या विविध संस्थांसाठी काम करणाऱ्या कंत्राटदारांकडील कामगार यांना पहिल्या टप्प्यात प्राधान्याने या योजनेत समाविष्ट करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे निर्देशही जिल्हाधिकारी पापळकर यांनी यावेळी दिले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ