ट्रॅव्हल्स कंपन्यांनी सहली रद्द कराव्या-जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश


अकोला,दि.१३ (जिमाका)-  कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा भाग म्हणून जिल्ह्यातील टूर ऑपरेटर्स व ट्रॅव्हल्स कंपन्यांनी आयोजित केलेल्या सहली रद्द कराव्या व किमान १५ मे पर्यंत सहली आयोजित करु नये, तसेच हॉटेल्स चालकांनी त्यांच्याकडे उतरणाऱ्या प्रवाशांची माहिती प्रशासनाला कळवावी, असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी आज  येथे दिले.
यासंदर्भात आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या लोकशाही सभागृहात ट्रॅव्हल कंपन्यांचे चालक, तसेच शहरातील व जिल्ह्यातील लॉज-हॉटेल चालक- मालक यांची बैठक  बोलावण्यात आली होती. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण , मनपाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. फारुख शेख, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे तसेच शहरातील ट्रॅव्हल एजंट,टूर ऑपरेटर्स, हॉटेल मालक चालक उपस्थित होते.
यावेळी उपस्थितांना जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. चव्हाण यांनी माहिती दिली.  त्यांचेकडील उतारु , प्रवाशी यांच्या तब्येतीची माहिती कळवावी तसेच परदेशातून आलेल्या पर्यटकांची तसेच प्रवाशांची माहितीही द्यावी. जेणे करुन खबरदारीची उपाययोजना राबविता येतील. जिल्हाधिकारी पापळकर यांनी उपस्थितांना सुचना केल्या की,  उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी  जिल्ह्यातील सर्व टूर्स व ट्रॅव्हल्स कंपन्यांची माहिती घ्यावी. त्यांच्या मार्फत प्रवास करणाऱ्या प्रवाशांची नोंद करावी.  जिल्ह्याबाहेर, राज्याबाहेर, देशाबाहेर आयोजित सहली रद्द कराव्या, सहली साठी जाणाऱ्या लोकांची माहिती  टूर्स व ट्रॅव्हल्स कंपन्यांनी उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांना देणे बंधनकारक करण्यात आले आहे. ट्रॅव्हल्स कंपन्यांच्या बसेस मध्ये आवश्यक स्वच्छता राखण्याच्या उपाययोजना करण्यात याव्या, अशा सुचना देण्यात आल्या.  हॉटेल्स चालकांनीही त्यांच्याकडे उतरणाऱ्या प्रवाशांची माहिती घ्यावी, विदेशातून येणाऱ्या प्रवाशांची विशेष दखल घ्यावी व त्याबद्दल प्रशासनाला कळवावे. प्रवासी निवास करतात त्या खोल्यांची स्वच्छता राखावी, असे सांगण्यात आले. सर्व ट्रॅव्हल कंपन्या व हॉटेल चालकांनी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ