पुणे,मुंबई, नागपूर, यवतमाळ येथून आलेल्या प्रवाशांचेही १४ दिवसांचे अलगीकरण; जिल्हाप्रशासनाचा निर्णय


अकोला,दि.२४ (जिमाका)- जिल्ह्यात पुणे, मुंबई, नागपुर, यवतमाळ येथून आलेल्या प्रवाशांचेही १४ दिवसांचे गृह अलगीकरण (home quarantine) करण्याचा निर्णय जिल्हाप्रशासनाने घेतला आहे. यासंदर्भात जिल्ह्याचे पालकमंत्री ना. बच्चू कडू यांनी दिलेल्या निर्देशानुसार जिल्ह्यात बाहेरुन जिल्ह्यात दाखल झालेल्या प्रवाशांच्या तपासणीबाबत निर्णय घेण्यात आला.
यासंदर्भात जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, जिल्ह्यात बाहेरुन जिल्ह्यात दाखल झालेल्या प्रवाशांची दोन गटात विभागणी करण्यात येणार आहे. त्यानुसार पुणे, मुंबई, नागपुर, यवतमाळ  येथून आलेल्या प्रवाशांची ‘अ’ यादी तयार होईल. तर त्याव्यतिरिक्त अन्य जिल्ह्यातून आलेल्या प्रवाशांची ‘ब’ यादी तयार होईल. त्यानुसार ‘अ’ यादीतील प्रवाशांची वैद्यकीय तपासणी जी सध्याही होत आहे, ती झाल्यानंतर त्यांना गृह अलगीकरण करुन त्यांच्यावर वैद्यकीय पथके निरीक्षण ठेवतील. त्यादृष्टिने जिल्ह्यातील ग्रामिण भागातील नियोजन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच शहरी भागात मनपा आयुक्त व सर्व नगरपालिका, नगरपंचायतींचे मुख्याधिकारी यांचे स्तरावर होईल,असे निर्देश आज जिल्हाधिकारी पापळकर यांनी दिले. तपासणी स्थानिक पातळीवर होईल.
‘गावात प्रवेश नाकारल्यास गंभीर दखल घेणार’
जिल्ह्यात ग्रामीण भागात काही ठिकाणी पुणे, मुंबई वा बाहेरील जिल्ह्यातून आलेल्या लोकांना गावात प्रवेश देत नसल्याची भूमिका काही ठिकाणी घेतल्याचे ऐकिवात येत आहे. ही बाब सामाजिकदृष्ट्या अयोग्य आहे. येणाऱ्या प्रत्येक प्रवाशाची तपासणी करुन  त्यानंतर आवश्यकता भासल्यास वैद्यकीय सल्ल्याने व निरीक्षणाखाली हे लोक राहणार आहेत. येणाऱ्या प्रत्येक प्रवाशावर आरोग्य विभागाचे लक्ष आहे. त्यामुळे ग्रामस्तरावर असे प्रकार घडू नये , घडल्यास त्याची गंभीर दखल घेतली जाईल, असेही जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
प्रत्येक तहसिल कार्यालयात नियंत्रण कक्ष
 जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात तहसिल कार्यालयात नियंत्रण कक्ष स्थापण्यात आले असून  संचारबंदी काळात नागरिकांना येणाऱ्या अडचणी व वैद्यकीय सुविधांची उपलब्धतेबाबत  तेथून नियोजन होईल. तसेच जिल्ह्यात संचारबंदी व त्याअनुषंगाने असलेल्या बंदोबस्ताची पाहणी उपविभागीय अधिकारी करणार असून  त्याचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना द्यावा, असे आदेश जिल्हाधिकारी यांनी आज निर्गमित केले.
संचारबंदीत मुभा असणाऱ्यांना त्रास होणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश
संचारबंदी जारी असतांना लोकांनी अनावश्यक फिरु नये.  दोन व्यक्तिंनी परस्परांत किमान तीन फुट अंतर राखावे. ज्या लोकांना अत्यावश्यक सेवेचा भाग म्हणून संचारबंदीतून वगळण्यात आले आहे. त्यांना त्यांच्या आस्थापनांनी दिलेले ओळखपत्र ग्राह्य धरुन जाण्या येण्याची मुभा द्यावी, विनाकारण त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी. प्रसारमाध्यमांतील कर्मचारी व प्रतिनिधींना त्यांच्या संस्थेने दिलेल्या ओळखपत्रावर  जाण्याची मुभा द्यावी,असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी आज पोलिसांना दिले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ