बॅंका, पोस्ट ऑफिसेस, ए.टी.एम सेंटर साठी नियमावली जारी


अकोला,दि.२१ (जिमाका)- कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंधासाठी  विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. त्या पार्श्वभुमिवर विविध बॅंका, पोस्ट ऑफिस येथे लोकांची होणारी गर्दी, तेथील कामकाजाचा भाग म्हणून हाताळली जाणारे पासबुक, चलनी नोटा इ. मुळे संसर्गाच्या प्रादुर्भावाची शक्यता लक्षात घेता  जिल्ह्यातील सर्व बॅंका, पोस्ट ऑफिसेस मधील कर्मचारी अधिकारी वर्गासाठी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी सुचना जारी केल्या आहेत. या सुचना  साथरोग प्रतिबंधात्मक कायदा १८९७ व आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ अन्वये देण्यात आल्या असून त्यांचे पालन करणे बंधनकारक असल्याचे म्हटले आहे.
सुचना याप्रमाणे-
१)     पोस्ट ऑफिस, बॅंक, ए.टी.एम.  येथे मुख्य प्रवेशद्वाराजवळ गार्ड नेमून काऊंटरवर एका वेळी एकच ग्राहक उपस्थित असेल याची दक्षता घ्यावी. उर्वरित ग्राहकांना किमान तीन फुट लांब अंतरावर थांबवावे.
२)     पैसे काढणे व कर्ज हप्ते भरणे वगळता अन्य सर्व सेवा दि.३१ मार्च पर्यंत बंद ठेवाव्या.
३)      ए.टी.एम. मशिनचे दररोज निर्जंतुकीकरण करावे.
४)   बॅंक, पोस्ट ऑफिस मध्ये येणाऱ्या ग्राहकांचे हात धुण्यासाठी  आवश्यक उपाययोजना करावी.
५)    बॅंक इमारतीची  स्वच्छता करावी.
६)     अधिकाधिक ऑनलाईन व्यवहार करण्याबाबत  ग्राहकांना प्रेरित करावे.
या आदेशांचे उल्लंघन झाल्यास भारतीय दंड संहिता (१९६० चा ४५) कलम १८८ अन्वये कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ