आणखी एक व्यक्ती निरीक्षणाखाली; तंबाखू विक्रीस बंदी, खाजगी रुग्णालयात अलगीकरण/ विलगीकरण कक्ष


अकोला,दि.१९(जिमाका)-  कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंधाच्या उपाययोजना जिल्हा प्रशासनाने आणखी कडक केल्या असून आता ग्रामिण भागातील आठवडी बाजार आठवडाभर बंद राहणार आहेत. शिवाय जिल्ह्यात तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ विक्रीस बंदी घालण्यात आली आहे तर सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिले असून  खाजगी रुग्णालयांनाही अलगीकरण/ विलगीकरण कक्षात प्रत्येकी दहा बेड राखीव ठेवून सज्जता ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दरम्यान आज विदेशातून आणखी एक प्रवासी दाखल झाला असून त्यास निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे.
                                             विदेशातून जिल्ह्यात दाखल झालेल्या आणखी एका व्यक्तीस निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. जिल्ह्यात आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत  एकूण ४७ प्रवासी विदेशातून दाखल झाले आहेत. त्यापैकी ४४ व्यक्तींशी प्रशासनाचा संपर्क झाला आहे.  ज्या तिन जणांचा संपर्क झालेला नाही ते अद्यापही संपर्का बाहेर आहेत.  चौघे अमरावती येथे तर दोघे नागपूर येथे आहेत व अन्य दोघे पुन्हा दुबईस परतले आहेत, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी दिली आहे.
ग्रामिण भागातील सर्व आठवडी बाजार बंद
अकोला जिल्ह्यात ग्रामीण भागात भरणारे आठवडी बाजार भरविण्यास साथरोग अधिनियम १८९७ मधील खंड २,३ व ४ मधील तरतूदीनुसार  तसेच आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५  नुसार प्रतिबंध करण्याचे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी आज निर्गमित केले आहेत. येता आठवडाभर हे आदेश अंमलात राहतील, त्यानंतर आढावा घेऊन पुढील आदेश निर्गमित करण्यात येतील.या आदेशाचे पालन न झाल्यास संबंधितांविरुद्ध भारतीय दंड संहिता, (१८६० चा ४५ ) च्या कलम १८८ अन्वये कारवाई करण्यात येईल,असा इशाराही देण्यात आला आहे.
तंबाखू, तंबाखूजन्य पदार्थ विक्रीस बंदी
सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यातून कोरोना विषाणूचा प्रसार होऊ शकत असल्याने त्यास प्रतिबंध करण्यासाठी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी आज जिल्ह्यातील सर्व तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणारे दुकाने दि.३१ पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश निर्गमित केले.  साथरोग अधिनियम १८९७ मधील खंड २,३ व ४ मधील तरतूदीनुसार  तसेच आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५  नुसार हे आदेश त्यांनी आज निर्गमित केले आहेत. या आदेशाचे पालन न झाल्यास संबंधितांविरुद्ध भारतीय दंड संहिता, (१८६० चा ४५ ) च्या कलम १८८ अन्वये कारवाई करण्यात येईल,असा इशाराही देण्यात आला आहे. तंबाखू, पान , गुटखा खाण्याच्या निमित्ताने पान टपरी, दुकाने यावर लोक एकत्र येतात, थुंकतात, धुम्रपान करतात यास मज्जाव करुन कोरोना विषाणू प्रसारास आळा बसावा म्हणून हे आदेश जारी करण्यात आले आहेत, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यावर कारवाईचे निर्देश
सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यातून कोरोना विषाणूचा प्रसार होऊ शकत असल्याने त्यास प्रतिबंध करण्यासाठी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी आज जिल्ह्यात सर्वत्र सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या व्यक्तिंवर कारवाई करण्याचे निर्देश  शहरी भागात महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत तसेच ग्रामिण भागात तहसिलदार व अन्य यंत्रणांना दिले आहेत. साथरोग अधिनियम १८९७ मधील खंड २,३ व ४ मधील तरतूदीनुसार  तसेच आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५  नुसार हे आदेश त्यांनी आज निर्गमित केले आहेत.
खाजगी रुग्णालयांना विलगीकरण कक्ष सज्ज ठेवण्याचे आदेश
 कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी  प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून  अकोला शहरातील  सहारा हॉस्पिटल, सिटी हॉस्पिटल, विदर्भ हॉस्पिटल, ओझोन हॉस्पिटल,  आयकॉन हॉस्पिटल यांनी तसेच अन्य सर्व खाजगी रुग्णालयांनी  अलगीकरण/ विलगीकरण कक्ष  आवश्यक मनुष्यबळासह सज्ज ठेवावे, असे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी आज निर्गमित केले आहेत. या आदेशाची अवहेलना केल्यास शिक्षापात्र अपराध मानण्यात येईल असेही या आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ