जारी केलेल्या प्रत्येक आदेशाची काटेकोर अंलबजावणी करा- जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर


अकोला,दि.२०(जिमाका)- कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने जारी केलेल्या प्रत्येक आदेशाची संबंधित  यंत्रणेने काटेकोर अंमलबजावणी करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी आज यंत्रणाप्रमुखांना दिले.
                        जिल्हाधिकारी कार्यालयात आज जिल्हाधिकारी पापळकर यांनी कोरोना प्रादुर्भाव प्रतिबंधासाठी   जिल्हा प्रशासनाने आजपर्यंत जारी केलेल्या आदेशांच्या अंमलबजावणीचा आढावा घेतला. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष पवार, मनपा आयुक्त संजय कापडणीस, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ., राजकुमार चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश आसोले, मनपाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. फारुख शेख, राज्य उपादन शुल्क विभागाच्या अधिक्षक स्नेहा सराफ, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, प्रांताधिकारी निलेश अपार तसेच अन्य विभागांचे यंत्रणा प्रमुख उपस्थित होते.
                         यावेळी जिल्हाधिकारी पापळकर म्हणाले की,  कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाची शक्यता टाळण्यासाठी गर्दी नियंत्रण, लोकांचे एकत्रिकरण टाळणे या उद्देशाने  सर्व आदेश जारी करण्यात आले आहेत. या आदेशांच्या काटेकोर अंमलबजावणीमुळेच कोरोना थोपवला जाऊ शकतो. त्यामुळे सर्व संबंधित यंत्रणांनी बजावलेल्या आदेशाची काटेकोर अंमलबजावणी करावी, असे त्यांनी सांगितले.
डॉक्टर संघटनांचे सहकार्य लाभणार
कोरोना विषाणू प्रादुर्भाव प्रतिबंधासाठी जिल्ह्यातील डॉक्टर्सच्या विविध संघटनांनी प्रशासकीय यंत्रणेला सर्वतोपरी सहकार्य देऊ केले आहे. आज या संदर्भात जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या समवेत आय एम ए,  निमा, जी पी ए या डॉक्टर्सच्या संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची चर्चा झाली. यावेळी डॉक्टर्स संघटनांनी जिल्हा प्रशासनाला लागेल ती वैद्यकीय मदत देण्याचे मान्य केले.  त्यासाठी आवश्यकतेनुसार डॉक्टर्सची उपलब्धता, दवाखान्यातील गर्दी टाळणार, अत्यावश्यक सेवा उपलब्ध करुन देणार आहेत. अत्यवस्थ रुग्णांना प्राधान्याने सेवा देणार या प्रमाणे सहकार्य देऊ केलं आहे. यावेळी आयएमएचे  अध्यक्ष डॉ. शशिकांत मोरे,  सचिव डॉ. पराग डोईफोडे, डॉ. अजयसिंग चौहान  तसेच अन्य संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ