जिवनावश्यक सेवा वगळता तीन दिवस बाजार बंद -जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांचे आदेश



अकोला,दि.२१ (जिमाका)- कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंधात्मक उपायांचा भाग म्हणून जिल्ह्यातील सर्व प्रकारची दुकाने, व्यापारी प्रतिष्ठाने, लहान मोठे व्यवसाय रविवार दि.२२ ते मंगळवार दि.२४ च्या मध्यरात्री १२ पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी आज दिले आहेत. या मनाई आदेशातून जीवनावश्यक सेवा मात्र वगण्यात आल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.
साथरोग प्रतिबंधात्मक कायदा १८९७ व आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ अन्वये हे आदेश जारी करण्यात आले असून  त्यानुसार  रविवार दि. २२ ते मंगळवार दि.२४ रात्री १२ वा. पर्यंत जिल्ह्यातील  सोने चांदी, कापड, ऑटोमोबाईल, भांडी, ईलेक्ट्रिकल,  ईलेकट्रॉनिक्स,  टिंबर, हार्डवेअर,  आठवडी बाजार,  मोबाईल, सलून, ब्युटी पार्लर, गॅरेज,  हॉटेल्स, रेस्टॉरन्ट,  स्वीट मार्ट,  लॉज, ढाबे, चहा, नाश्ता, पान टपरी व अन्य सर्वच प्रतिष्ठाने बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यातून जीवनावश्यक सेवा उदा. भाजीपाला,  किराणा दुकान, औषधालये,  दुध इ. व्यवसायांना वगळ्यात आल्याचे स्पष्ट केले आहे. या आदेशांचे उल्लंघन झाल्यास भारतीय दंड संहिता (१९६० चा ४५) कलम १८८ अन्वये कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.
जनता कर्फ्युत सहभागाचे आवाहन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनानुसार जनतेने रविवार दि.२२ रोजी स्वतःहून संचारबंदी पाळावी असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले आहे.  एक दिवसाची स्वतः संचार बंदी पाळल्यास कोरोना विषाणूचे संक्रमण रोखण्यात प्रशासनाच्या प्रयत्नाला यश मिळेल. एक दिवस संचारबंदी पाळून लोकांनी देश सेवा करावी असे आवाहन त्यांनी केले.
एमआयडीसीतील उद्योजकांचाही सहभाग
जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी आज येथील औद्योगिक वसाहतीतील उद्योजकांच्या संघटनेसोबत चर्चा केली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे उपस्थित होते. यावेळी या उद्योजकांनी आपले उद्योग बंद ठेवावे, कर्मचाऱ्यांना शक्यतो घरुन काम करण्यास सांगावे,  ते शक्य नसल्यास किमान २५ टक्के उपस्थितीतच कामकाज करावे. येणाऱ्या कामागार कर्मचाऱ्यांची स्वच्छता व निर्जंतूकता याबाबत दक्षता घ्यावी. अशा सुचना जिल्हाधिकाऱ्यांनी केल्या. त्याप्रमाणे अंमलबजावणी करण्याचे उद्योजक संघटनेने मान्य केले.
पुणे- मुंबईहून येणाऱ्यांची आवश्यकतेनुसार तपासणी; मात्र नोंद आवश्यक
जिल्ह्यात मुंबई, पुणे वा अन्य मोठ्या शहरातून दाखल होणाऱ्या व्यक्तींनी आपली माहिती प्रशासनाला कळविणे आवश्यक आहे. त्यांना काही त्रास होत असल्यास वा लक्षणे जाणवल्यास त्यांनी नजिकच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात वा दवाखान्यात डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. आवश्यकतेनुसार तपासणी करावी असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिले आहेत.
प्रवाशांच्या तपासणीसाठी १२ पथके तैनात
जिल्ह्यात मुंबई,पुणे वा अन्य ठिकाणाहून येणाऱ्या प्रवाशांची तपासणी व नोंद करण्यासाठी रेल्वे स्थानक, एस. टी. बसस्थानक  व लक्झरी बसस्थानक येथे वैद्यकीय, पोलीस व लिपिक अशांचे पथक तसेच प्रवाशांना उतरल्यावर त्यांचे हात सॅनिटायझरने स्वच्छ करण्यासाठी १२ पथके तैनात करण्यात आले आहेत. हे पथके गाड्या येण्या व जाण्याच्या वेळापत्रकानुसार तेथे उपस्थित राहून  उपाययोजना राबवित आहेत. त्यांनाही प्रवाशांनी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. या पथकांचे तपासणीसाठी मनपाचे आरोग्य अधिकारी डॉ. फारुख शेख यांच्या नियंत्रणात काम सुरु आहे तर उपप्रादेशिक परिवहन अधिकारी जिचकार यांचे पथकही या कामी सज्ज ठेवण्यात आले आहे.
मदतीसाठी इच्छुक सेवानिवृत्त वैद्यकीय अधिकारी व डॉक्टर्सना आवाहन
भविष्यातील परिस्थिती लक्षात घेता, सेवानिवृत्त वैद्यकीय अधिकारी, किंवा वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींना, कोरोना  प्रतिबंधक उपाययोजना करण्याकरता, प्रशासनासोबत काम करावयाची इच्छा असेल ,अशांनी जिल्हा प्रशासन व जिल्हा शल्यचिकित्सक यांच्याकडे आपली नावे द्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ