कोरोना विषाणू खबरदारी उपाययोजना :अफवा पसरवणाऱ्यांवर करडी नजर; सार्वजनिक-गर्दीचे कार्यक्रम रद्द - जिल्हाधिकारी पापळकर यांचे निर्देश


अकोला,दि.११ (जिमाका)-  आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ ची अंमलबजावणी करीत जिल्हा प्रशासन कोरोना विषाणू संसर्गाच्या स्थितीचा मुकाबला करण्यासाठी सज्ज झाले आहे. त्यासाठी विहित कार्यपद्धतीचा अवलंब सुरु केला असून, या विषाणू संसर्गासंदर्भात सोशल मिडीयाद्वारे चुकीची माहिती पसरविणाऱ्या  व्यक्तींवर सायबर सेल मार्फत करडी नजर ठेवावी, तसेच सार्वजनिक व लोकांची गर्दी होईल असे जत्रा, कार्यक्रम, उत्सव आयोजकांनी रद्द करावेत,असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी आज (दि.११) झालेल्या आढावा बैठकीत दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या लोकशाही सभागृहात पार पडलेल्या बैठकीस जिल्हाधिकाऱ्यांसमवेत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष पवार, अपर जिल्हाधिकारी नरेंद्र लोणकर, जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. शिवहरी घोरपडे,  जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश आसवले, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे तसेच अन्य यंत्रणा प्रमुख उपस्थित होते.
जिल्हाधिकारी पापळकर यांनी सांगितले की,  राज्य शासनाच्या अद्यावत सुचनांचे तात्काळ आदानप्रदान करुन  परिस्थिती हाताळावी. गृहविभागामार्फत शहरातील हॉटेल्स व लॉजेस येथे निवासास आलेल्या प्रवाशांपैकी कोणी आजारी असल्यास  त्याची माहिती तात्काळ पोलीसांमार्फत आरोग्य विभागास कळवावी.  विदेशातून आलेल्या व्यक्तींची माहिती पोलीसांनी संकलित करुन आरोग्य विभागास द्यावी, त्यासाठी शहरातील हॉटेल चालकांची बैठक घेण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.  या विषाणू संदर्भात सोशल मिडीयामार्फत  अफवा व गैरसमज पसरवणाऱ्यांबाबत पोलीस दलाच्या सायबर सेल मार्फत करडी नजर ठेवून कारवाई करुन गुन्हे दाखल करावे. तसेच ही परिस्थिती हाताळण्यासाठी आरोग्य विभागाने विहित कार्यपद्धतीचा अवलंब करुन नोंदी ठेवाव्या. शिवाय अन्य विभागांनीही आपापल्या विभागांच्या विहित कार्यपद्धतीचा अवलंब करावा.  याबाबत महानगरपालिका, नगरपालिका, ग्रामिण रुग्णालये यांनाही अवगत करावे. या विषाणू संदर्भात माहिती व मदत उपलब्ध होण्यासाठी जिल्हा, शहर व तालुकास्तरावर मदत व माहिती कक्ष कार्यान्वित करावे. केलेल्या कार्यवाहिचा दैनंदिन अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना सादर करावा.
या स्थितीचा गैरफायदा घेऊन औषधे , मास्क वा अन्य तत्सम वस्तूंची साठेबाजी करणे वा चढ्या दराने विक्री करणाऱ्यांवर थेट कारवाई करण्याचे आदेश यावेळी जिल्हाधिकारी पापळकर यांनी दिले. ही कारवाई अन्न व औषध प्रशासन विभागाने करावी. जिल्ह्यातील परिस्थितीचा विचार करुन  संशयित रुग्णांचा तपास करणे, त्यांना शासकीय रुग्णालयात विलगीकरण कक्षात दाखल करण्यास सहकार्य न करणाऱ्या व्यक्ती व खाजगी रुग्णालयांवर कारवाई करण्याचेही निर्देश देण्यात आले.
सध्या अकोला जिल्ह्यात व शहरात संशयित रुग्ण नसून या संदर्भात जनजागृतीसाठी शाळा, अंगणावाडी, महाविद्यालये स्तरावर सुचना देण्याची व्यवस्था करावी.  जिल्ह्यात नागरिकांच्या गर्दीचे कार्यक्रम आयोजकांनी रद्द करावे वा पुढे ढकलावे, असे आवाहनही यावेळी जिल्हाधिकारी पापळकर यांनी केले. आरोग्य विभागाने संशयित रुग्णांचा स्वयंसेवी संस्था व पोलीसांच्या माध्यमातून तपास घ्यावा. या उपाययोजना तालुकास्तरावरही द्याव्या.
विदेशातून दाखल होणारे पर्यटक वा नागरिकांनी जिल्ह्यात दाखल होतांनाच जिल्हा रुग्णालयाशी संपर्क साधून  नोंदणी करावी, असेही आवाहन यावेळी करण्यात आले. तसेच या संदर्भात प्रवाशांनी  आपत्ती व्यवस्थापन कायदा कलम ३० अन्वये प्रशासनाच्या सुचनांचे पालन करणे बंधनकारक असून  पालन न केल्यास व बाधा निर्माण केल्यास कलम  ५१ अन्वये कारवाई करण्यात येईल, असेही सांगण्यात आले.
 यासंदर्भात नागरिकांच्या माहितीसाठी  राज्यस्तरीय नियंत्रण कक्ष  ०२०-२६१२७३९४  तसेच राष्ट्रीय कॉल सेंटर ९१-११-२३९७८०४६ हा तसेच १०४ हा टोल फ्रि क्रमांक जाहीर केला आहे. नागरिकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा,असे आवाहन करण्यात आले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ