जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आजच्या स्थितीचा आढावा


अकोला,दि.२२ (जिमाका)- जिल्हाप्रशासनाने आजपासून जीवनावश्यक वस्तू वगळता लागू केलेल्या बाजार बंदच्या पहिल्या दिवसाच्या स्थितीचा तसेच कोरोना विषाणू संसर्ग व जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेचा आज जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी आज आढावा घेतला.
यावेळी त्यांचे समवेत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष पवार, मनपा आयुक्त संजय कापडणीस, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. शिवहरी घोरपडे, उपअधिष्ठाता डॉ कुसुमाकर घोरपडे, डॉ.अष्टपुत्रे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ सुरेश असोले, जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ.राजकुमार चव्हाण, उपविभागीय अधिकारी डॉ. निलेश अपार, मनपाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.फारुक शेख, जिल्हा विस्तार माध्यम अधिकारी डॉ प्रकाश गवळी, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
यावेळी जिल्ह्यात परदेशातून आलेल्या व्यक्ती, त्यांची वैद्यकिय तपासणी आवश्यकतेनुसार होणारे अलगीकरण, विलगीकरण, उपलब्ध औषध साठा , हॉस्पिटल बेड याबाबतचा संपूर्ण आढावा घेण्यात आला. तसेच ग्रामिण भागामध्ये जनतेत भिती निर्माण होऊ नये यासाठी आरोग्य विभागामार्फत आरोग्य अधिकारी तसेच अन्य कर्मचारी, आशा सेविका यांना प्रशिक्षण देण्यात आले असून ग्रामिण भागातील लग्न समारंभ, तेरवी यासारख्या कार्यक्रमांची तारखांनिहाय यादी  तयार करणे, अशा समारंभांना ५० पेक्षा अधिक व्यक्ती  उपस्थित राहणार नाहीत याची दक्षता घेण्याबाबतही जिल्हाधिकारी पापळकर यांनी निर्देश दिले.
 तसेच  शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जिल्हा सर्वोपचार रुग्णालय यांचेवर अलगीकरण, विलगीकरण कक्षांची व्यवस्था करणे, तसेच आवश्यकता भासल्यास आणखी व्यवस्था करण्याचे नियोजनाची जबाबदारी सोपविण्यात आली. शहरातील जनतेला जीवनावश्यक सेवा पुरविणे व वस्तूंचा पुरवठा होईल याची व्यवस्था करणे यासाठी  नगरपंचायत, नगरपालिका, महानगरपालिका, तसेच ग्रामिण भागात ग्रामपंचायतीने व्यवस्था पहावी, असे निर्देश यावेळी देण्यात आले.
                        दरम्यान राज्यशासनाने घोषित केल्यानुसार, रेल्वे, खासगी बसेस, एस टी बसेस बंद राहणार असून जीवनावश्यक आणि अत्यावश्यक कारणांसाठीच शहरांतर्गत बस सेवा सुरु राहील,अन्न धान्य, भाजीपाला, औषधे ही दुकाने तसेच बँका, वित्तीय संस्था सुरू राहतील असे स्पष्ट करण्यात आले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ