‘कोरोना’ प्रतिबंधासाठी जिल्हाप्रशासनाची सज्जता


अकोला,दि.१६(जिमाका)- कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने सज्जता केली आहे. तथापि प्रशासनातर्फे करण्यात आलेल्या उपाययोजना ह्या विषाणू प्रसार रोखण्यासाठी असून नागरिकांनी सतर्क राहून प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी आज केले. सद्यस्थितीत जिल्ह्यात कोरोना संसर्गित एकही रुग्ण नसून यापुर्वी दाखल संशयित रुग्णांचे चाचणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत. दरम्यान विदेशातून आलेला आणखी एका व्यक्तीस आज रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्या व्यक्तीचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. दरम्यान आज ग्रामिण भागातील शाळाही उद्यापासून (दि.१७) बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी पापळकर यांनी दिले आहेत.
यासंदर्भात आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे सर्व जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्तांशी संवाद साधला. यावेळी अकोला जिल्ह्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्यासह मनपा आयुक्त संजय कापडणीस, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.सुभाष पवार, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.शिवहरी घोरपडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ सुरेश आसवले, जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. राजकुमार चव्हाण, मनपा आरोग्य अधिकारी डॉ.फारुक शेख,आरोग्य विभागाचे जिल्हा माध्यम व विस्तार अधिकारी प्रकाश गवळी, डॉ. भावना मेश्राम,  जिल्हा शिक्षणाधिकारी (प्राथमिक) प्रकाश मुकूंद, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे तसेच अन्य विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
त्यानंतर जिल्हाधिकारी पापळकर यांनी यंत्रणा प्रमुखांशी संवाद साधला व राज्य शासनाच्या आरोग्य विभागाकडून प्राप्त सुचनांची अंमलबजावणी करण्यासाठी सर्व विभागांनी परस्पर समन्वय राखावा, असे निर्देश दिले.
यावेळी माहिती देण्यात आली की, जिल्ह्यात रविवार(दि.१५) पर्यंत एकूण २२ प्रवासी परदेशातून आले आहेत.  त्यात अकोला जिल्ह्यातील २० तर वाशीम जिल्ह्यातील दोन आहेत. २२ पैकी सहा प्रवाशांना येऊन १४ दिवसांपेक्षा अधिक कालावधी उलटून गेला आहे.  उर्वरित १६ पैकी दोघांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते त्यांचे नमुने चाचणीसाठी पाठविले होते. त्यांचे चाचणी अहवाल निगेटिव्ह  आले. या सर्व व्यक्तिंच्या संपर्कात वैद्यकीय पथक आहे. दरम्यान आज आणखी एक व्यक्ती विदेशातून अकोल्यात दाखल झाली असून त्या व्यक्तीचे नमुने घेऊन चाचणीसाठी पाठविले आहे, सध्या या व्यक्तीस निरीक्षणात ठेवण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सकांनी दिली आहे.
 सध्या जिल्हा रुग्णालयात ८ बेडचे विलगीकरण कक्ष असून दोन खाजगी रुग्णालयात ४ बेडचे स्वतंत्र विलगीकरण कक्ष स्थापन करण्यात आले आहे. जिल्हा रुग्णालयाकडे व्हेंटीलेटर्स, औषधे व अन्य आवश्यक उपकरणे, तपासणी सुविधा इ. पुरेसे उपलब्ध आहे. तसेच डॉक्टर्स आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांची  अहोरात्र ड्युटी लावण्यात आली आहे. या उपाययोजना करतांनाच प्रशासनाने प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत जनजागृतीवर मोठ्या प्रमाणावर भर दिला असून जनजागृती केली जात आहे. शाळा, महाविद्यालये तसेच लोकांची गर्दी होईल अशा ठिकाणांवर एकत्र येण्याबाबत मनाई आदेशही देण्यात आले आहेत.
आधारकार्ड अद्यावतीकरण शिबीर रद्द
विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना लाभ पूर्ववत सुरु ठेवण्यासाठी हयातीचे प्रमाणपत्र देणे व आधार कार्ड अद्यावतीकरण करण्यासाठी  सर्व तालुक्यांना तहसिल कार्यालयात  मंगळवार दि.१७ व बुधवार दि.१८ रोजी विशेष शिबीर आयोजित करण्यात आले होते.  कोरोना विषाणू प्रादुर्भाव होऊ नये यासाठी करावयाच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा भाग म्हणून हे शिबीर पुढे ढकलत असल्याचे तहसिलदार (संगायो) यांनी कळविले आहे.
ग्रामिण भागातील शाळा,महाविद्यालयेही ३१पर्यंत बंद

जिल्ह्यातील ग्रामिण भागातील शाळा, महाविद्यालये ही दि.३१ मार्च पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी आज (दि.१६) निर्गमित केले. या संदर्भात जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त माहितीनुसार, इयत्ता १० वी व १२ वी च्या परिक्षा विहीत वेळापत्रकानूसार घेण्यात याव्यात, तसेच आजारी विद्यार्थी इतर विद्यार्थ्याच्या संपर्कात येणार नाही या साठी आवश्यक ती दक्षता व खबरदारी घेण्याच्या सूचना निर्गमित केल्या आहेत. त्यानुसार जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी साथरोग अधिनियम १८९७ मधील खंड २,३ व ४ मधील तरतूदीनुसार करोना विषाणूचा होणारा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपायोजनेचा एक भाग म्हणून अकोला जिल्ह्यातील ग्रामिण भागातील सर्व सरकारी व खाजगी शाळा,अंगणवाड्या तसेच महाविद्यालये व आयुक्त, व्यवसाय व प्रशिक्षण केन्द्रे आस्थापनेवरील शैक्षणिक संस्था दिनांक ३१ मार्च २०२० पर्यत बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशाचे उल्लंघन झाल्यास भारतीय दंड संहिता, (१८६० चा ४५ ) च्या कलम १८८ अन्वये कारवाई करण्यात येईल,असा इशाराही देण्यात आला आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ