बाहेरगावाहून व्यक्ती आली असल्यास कुटूंबांना घरपोच धान्य वितरण- पालकमंत्री बच्चू कडू यांचे जिल्हाप्रशासनाला निर्देश


अकोला,दि.२६ (जिमाका)-  कोरोना विषाणू संसर्ग प्रादुर्भाव रोखण्यासाठी  उपाययोजनेचा भाग म्हणून ज्या कुटूंबात बाहेरगावाहून ( मुंबई, पुणे, यवतमाळ, नागपूर इ.) व्यक्ती आली असेल अशा कुटूंबांना सार्वजनिक वितरण व्यवस्थेमार्फत वितरीत होणारे धान्य हे घरपोच देण्यात यावे तसेच त्यांची वैद्यकीय तपासणी ही वैद्यकीय पथकाने घरी जाऊन करावी,असे निर्देश राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास , शालेय शिक्षण, महिला व बालविकास, इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक  मागास प्रवर्ग, विमुक्त जाती भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, कामगार राज्यमंत्री  तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू  यांनी जिल्हा प्रशासनास दिले.
 त्यानुसार जिल्हाप्रशासन ही यंत्रणा राबवेल व गावोगावी तसेच शहरी भागातही होत असलेल्या सर्वेक्षणाच्या आधारे घरपोच धान्य व वैद्यकीय सेवा पोहोचविणार आहे, असे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी स्पष्ट केले आहे. हे धान्य त्या कुटूंबाच्या गरजेनुसार व प्राधान्याने उपलब्ध करुन देण्यात येईल असेही जिल्हाधिकारी पापळकर यांनी पुरवठा विभागाला निर्देश दिले आहेत.यामागे त्या कुटूंबातील व्यक्तींनी बाहेर पडू नये हा उद्देश असल्याचेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
भाववाढ व साठेबाजीविरोधात पथके कार्यान्वित
जिल्ह्यात संचारबंदीचा गैरफायदा घेऊन काही व्यापारी  अनावश्यक भाववाढ व साठेबाजी करुन क्रृत्रिम तुटवडा निर्माण करण्याचा प्रयत्न करु नये म्हणुन जिल्ह्यात भाववाढ व साठेबाजीविरुद्ध पथके कार्यान्वित करण्यात आले आहेत, असे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी कळविले आहे.  यासंदर्भात आज जिल्हाधिकारी पापळकर यांनी  जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्या नेतृत्वात जिल्हाभरात पथके तयार केली आहेत. ही पथके  तहसिलदार, पुरवठा निरीक्षक यांच्या नेतृत्वात कामे करतील. तसेच अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांचीही पथके तयार करण्यात आली आहेत. या पथकांनी  बाजारात पाहणी करुन  घाऊक तसेच किरकोळ विक्रेत्यांवर लक्ष ठेवायचे आहे.  अन्न औषध प्रशासन विभागाचे अधिकारी मेडीकल स्टोअर्स व अन्य ठिकाणी पाहणी करतील.या ठिकाणी भाववाढ व साठेबाजीचे प्रकार निदर्शनास आल्यास  तात्काळ कारवाई करावयाची आहे, असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिले आहेत.
अन्नधान्य, भाजीपाला, जीवनावश्यक वस्तूंची मुबलक उपलब्धता
जिल्ह्यात अन्नधान्य, भाजीपाला, फळे तसेच अन्य जीवनावश्यक वस्तूंची मुबलक उपलब्धता आहे. तरी नागरिकांनी घाबरुन जाऊ नये. विनाकारण खरेदीसाठी गर्दी करु नये. दुकानांवर खरेदीसाठीही दुकानदारांनी  ग्राहकांचे परस्परांमधील अंतर राखूनच खरेदी विक्रीचा व्यवहार करावयाचा आहे. त्याची खबरदारी घ्यावयाची आहे. हीच बाब पेट्रोलपंप व अन्य सेवांसाठीही लागू असल्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी स्पष्ट केले आहे.
मनपा कर्मचारी अत्यावश्यक सेवेत वर्ग
आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार, महानगरपालिकेचे कर्मचारी हे अत्यावश्यक सेवेत वर्ग करण्यात आले आहेत. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचारीही वर्ग करण्यात आले आहेत. असे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर व मनपा आयुक्त संजय कापडणीस यांनी संयुक्तरित्या निर्देश दिले आहेत. त्यादृष्टिने ज्या कर्मचाऱ्यांवर अत्यावश्यक सेवेची जबाबदारी सोपविण्यात आली आहे, त्या कर्मचाऱ्यांनी कामात हयगय केल्याचे निदर्शनास आल्यास आपत्ती व्यवस्थापन अधिनियम व साथरोग प्रतिबंधक अधिनियमान्वये त्यांचेवर कारवाई करण्यात येईल,असेही स्पष्ट करण्यात आले आहे. सध्या महानगरपालिकेतर्फे शहरात साथरोगाचे सर्वेक्षण सुरु आहे. त्यात सुमारे ४०० हून अधिक कर्मचारी गुंतले असून अन्य कर्मचारी स्वच्छता व फवारणी आदी कामांध्ये गुंतले आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ