कोरोना चाचणीसाठी येत्या १५ दिवसांत प्रयोगशाळा उभारा पालकमंत्री ना.बच्चू कडू


अकोला,दि.१९(जिमाका)- कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंधासाठी प्रशासनातर्फे विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. तथापि कोरोना संसर्गाचे निदान होण्यासाठी आवश्यक प्रयोगशाळा अकोल्यात नाही. त्यासाठी नमुने नागपूर येथे पाठवावे लागतात, शासनाने दिलेल्या तातडीच्या निधीतून येत्या १५ दिवसांत ही प्रयोगशाळा उभारुन कार्यान्वित करा, असे निर्देश राज्याचे  जलसंपदा व लाभक्षेत्र विकास , शालेय शिक्षण, महिला व बालविकास, इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक  मागास प्रवर्ग, विमुक्त जाती भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, कामगार राज्यमंत्री  तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू  यांनी आज येथे जिल्हा प्रशासनास दिले.
 येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ना. कडू यांनी आज कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा आढावा घेतला. त्यांचे समवेत विधान परिषद सदस्य आ. डॉ. रणजित पाटील, विधानसभा सदस्य आ. नितीन देशमुख, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, पोलीस अधिक्षक अमोघ गावकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष पवार, मनपा आयुक्त संजय कापडणीस, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.शिवहरी घोरपडे, जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. राजकुमार चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ सुरेश आसोले, मनपा आरोग्य अधिकारी डॉ.फारुक शेख, आरोग्य विभागाचे जिल्हा माध्यम व विस्तार अधिकारी प्रकाश गवळी, डॉ. भावना मेश्राम,  जिल्हा शिक्षणाधिकारी (प्राथमिक) प्रकाश मुकूंद, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, प्रांताधिकारी  निलेश अपार आदी उपस्थित होते.
यावेळी पालकमंत्र्यांनी कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंध यासंदर्भात केलेल्या उपाययोजना, प्रतिबंधात्मक कारवाई तसेच उपचार सुविधा, विलगीकरण सुविधा याबाबत यंत्रणानिहाय आढावा घेतला. यासंदर्भात एक सादरीकरणही करण्यात आले.  पालकमंत्री ना.कडू म्हणाले की,  संशयितांना वा बाहेर देशातून येणाऱ्या प्रवाशांना वैद्यकीय सुविधा देणारे कर्मचारी, डॉक्टर्स आदींची सुरक्षितता व त्यांचा संसर्गापासून बचाव करण्यासाठी पुरेशी यंत्रणा , साधनसामुग्री उपलब्ध करा. अकोला येथेच रुग्णांचे घशातील स्त्रावाचे नमुने तपासले जावेत यासाठी येथेच प्रयोग शाळा उभारण्यासाठी शासनाने यंत्रसामुग्री व संलग्नित यंत्रणा पाठवली आहे. बांधकामासाठी निधीही दिला आहे. त्यामुळे येत्या १५ दिवसात बांधकाम पूर्ण करुन प्रयोगशाळा उभारावी, असे निर्देश ना. कडू यांनी यावेळी दिले.  याशिवाय प्रतिबंधात्मक उपाय म्हणून लोकांची गर्दी कमी व्हावी यासाठी शक्य त्या सर्व उपाययोजना कराव्या. लग्न समारंभ व त्या लग्नात बाहेरगावाहून येणाऱ्या लोकांची नोंद ठेवणे आदी उपाययोजना राबवून शक्य तितकी लोकांची गर्दी कमी करावी यासाठी लोकांना सांगावे, असे आवाहन त्यांनी केले. रेल्वे, बसस्थानक या ठिकाणी बाहेरून येणाऱ्या लोकांची माहिती व त्यांची तपासणी याबाबतची व्यवस्था निर्माण करण्याची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच सफाई कामगारांना हॅण्ड ग्लोव्ह्ज, मास्क आदी  सुविधा तात्काळ उपलब्ध करुन द्याव्या, असे निर्देशही त्यांनी दिले.
पालकमंत्र्यांचे जनतेला आवाहन
 कोरोना संसर्गासंदर्भात लोकांनी गांभीर्याने घेण्याची गरज आहे. कमीत कमी वेळ बाहेर जावे, हात वारंवार धुवावे, परस्पर संपर्क टाळावा, सार्वजनिक जागी थुंकणे,  अस्वच्छता करणे अशा सवयी तात्काळ थांबवल्या पाहिजे. विविध कार्यक्रमाचे आयोजन उदा. लग्न समारंभ इ. करणे थांबवा, असे आवाहन ना. कडू यांनी केले. ते म्हणाले की, कोरोना विषाणू विरुद्धची ही प्रत्येकाची लढाई आहे. त्यात प्रत्येक जण सैनिक म्हणून सहभागी झाला पाहिजे.  स्वतःचा व स्वतःच्या कुटूंबाचा बचाव करण्यासाठी सावधानता आणि स्वच्छता बाळगून ही लढाई आपल्याला लढायची आहे.
पालकमंत्र्यांच्या हस्ते पीपीई किट वितरण
जिल्हा रुग्णालयातील विलगीकरण कक्षातील वैद्यकीय अधिकारी कर्मचारी यांच्या दैनंदिन सुरक्षा व वापरासाठी ५० पीपीई किट पालकमंत्री ना. बच्चू कडू यांच्या हस्ते वितरीत करण्यात आले.
प्रयोगशाळेसाठी ५० लक्ष प्राप्त
अकोला येथे कोरोना विषाणू संसर्ग निदानासाठीची प्रयोगशाळा उभारण्यासाठी शासनाने ५० लक्ष रुपयांचा निधी पाठवला आहे. हा निधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्गही केला आहे.  या  चाचणीसाठी लागणारे पीसीआर (पॉलिमरेज चेन रिॲक्शन) मशिन, त्याला लागणारी संलग्न यंत्रे प्राप्त झाली आहेत. आता प्रयोग शाळेचे आवश्यक बांधकाम करुन यंत्रसामुग्री उभारणे त्यास एनआयव्ही ( राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था, पुणे) यांची अधिस्विकृती मिळवून लगेचच काम सुरु करता येऊ शकते, ही प्रक्रिया १५ दिवसात करणे आवश्यक आहे, अशी माहिती  शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.शिवहरी घोरपडे यांनी दिली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ