जिल्ह्यातील सर्व डॉक्टर्स प्रशासनासोबत -आयएमए पदाधिकाऱ्यांची सामाजिक बांधिलकी


अकोला,दि.२८ (जिमाका)-  कोरोना विषाणू संसर्ग प्रादुर्भावाच्या पार्श्वभुमिवर जिल्ह्यातील सर्व लहान मोठे डॉक्टर्स व  हॉस्पिटल्स हे प्रशासनासोबत असून आवश्यकता भासेल तेव्हा सर्व डॉक्टर्स आपली सेवा द्यायला तयार आहेत, तसेच जिल्ह्यातील डॉक्टर्स आपले दवाखानेही सुरु ठेवतील,असे निसंदिग्ध आश्वासन इंडीयन मेडीकल असोसिएशन (आयएमए) या डॉक्टर्स संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांना आज दिले.
यासंदर्भात आयएमए या डॉक्टरांच्या संघटनेची आज जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात बैठक झाली. यावेळी अपर जिल्हाधिकारी नरेंद्र लोणकर, मनपा आयुक्त संजय कापडणीस, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण,  निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, प्रांताधिकारी निलेश अपार, तहसिलदार विजय लोखंडे, सहाय्यक आयुक्त अन्न व औषध आदी प्रशासकीय अधिकारी  व आयएमए चे पदाधिकारी सदस्य डॉ. संतोष ठाकरे,  डॉ. अजयसिंग चव्हाण, डॉ. निलेश कोरडे, डॉ. राम शिंदे, डॉ. के .के. अग्रवाल, डॉ. रणजित देशमुख,  डॉ. प्रशांत लिबेकर, केमिस्ट आणि ड्रगिस्ट असोसिएशनचे  सुधीर वोरा, सचिव अंजुल जैन आदी उपस्थित होते.
 कोरोना प्रादुर्भावाचा प्रतिबंध करण्याची उपाययोजना व नियोजनाचा भाग म्हणून राज्य शासनाच्या अकोला जिल्ह्यातील सर्व डॉक्टर्सने आपले खाजगी दवाखाने सुरु ठेवावे. त्यामुळे लोकांना स्थानिक पातळीवर अन्य कोणत्याही आजारासाठी मदत व मार्गदर्शन उपलब्ध होईल. अशावेळी मात्र लोकांनी  एक किंवा सोबतीला एक मदतनीस नातेवाईक यापेक्षा अधिक जणांनी  डॉक्टरांकडे गर्दी करु नये.  तसेच किमान अंतर राखण्याच्या सुचनेचे काटेकोर पालन करावे, अशा सुचना देण्यात आल्या.
 डॉक्टरांच्या सॅनिटायझर्स, तसेच आवश्यक उपकरणे, साहित्य उपलब्धता करुन देणे, सद्यस्थितीत दाखल रुग्णांना भोजनाची सोय करुन देणे, औषधांचा व सॅनिटायझर्सचा पुरवठा सुरळीत करणे या मागण्यांबाबत प्रशासन डॉक्टर्सना सहकार्य करेल असेही जिल्हाधिकारी पापळकर यांनी स्पष्ट केले.
अशा या आपत्तीच्या प्रसंगी डॉक्टर्स आपली सेवा देण्यास उत्सूक आहेत असे डॉक्टरांनी यावेळी सांगितले. शहरातील व शहराबाहेरील खाजगी हॉस्पिटल्स मध्ये प्रशासनाच्या सुचनेनुसार आवश्यक बेड उपलब्ध ठेवल्याचेही यावेळी सांगण्यात आले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ