जिल्ह्याच्या सिमा, धार्मिक स्थळे बंद; जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्याचे नियोजन


अकोला,दि.२३ (जिमाका)- कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्याच्या उपायांचा भाग म्हणून जिल्ह्याच्या सर्व सिमा बंद करण्यात आल्या असून बाहेरील जिल्ह्याशी कोणत्याही प्रकारचे आवागमन बंद राहील. संचारबंदीत जीवनावश्यक वस्तू व सेवा उपलब्ध व्हाव्या यासाठी नियोजन करण्यात आले असून नागरिकांनी आपापल्या घरातच रहावे, असे आवाहनही जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले आहे.
 या संदर्भात जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या नेतृत्वात पोलीस अधिक्षक अमोघ गावकर, मनपा आयुक्त संजय कापडणीस, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे व अन्य विभागप्रमुखांच्या उपस्थितीत जिल्ह्यातील सद्यस्थितीचा आढावा घेण्यात आला.
जिल्ह्यातील उद्योग- कारखाने बंद
जिल्ह्यातील विविध उद्योग व कारखानेही बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिले आहेत. या कारखाने व उद्योगांत विविध कामगार, कर्मचारी, वाहतुकदार,  आदींची एकत्र येण्याची शक्यता लक्षात घेता त्यावर प्रतिबंध घालण्यात आले आहेत.  त्यातून  औषधे निर्माण करणारे, वैद्यकीय सेवेचे साहित्य निर्मिती करणारे कारखाने, सॅनिटायझर, साबण, जंतूनाशक,हॅण्डवॉश तयार करणाऱ्या कंपन्या, कारखाने,कृषि उत्पादनावर प्रक्रिया करणारे उद्योग दालमिल, ऑईल कंपन्या इ. अत्यावश्यक वस्तू सेवा पुरविणारे उद्योग यांना वगळण्यात आले आहे.
जिल्ह्याच्या सिमा बंद
अकोला जिल्ह्याच्या सिमा बंद करण्यात आल्या असून  कोणत्याही मार्गाने जिल्ह्यात बाहेरुन वा शेजारील जिल्ह्यातील व्यक्तीस येण्यास बंदी करण्यात आली आहे. त्यासाठी जिल्ह्यात येणाऱ्या सर्व मार्गांवर पोलिस पथके तैनात करण्यात आली आहेत.  हे आदेश आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ व साथरोग अधिनियम १८९७ मधील खंड २, ३ व ४   अन्वये जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी जारी केले असून  हे आदेश पोलीस व आरोग्य तसेच आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधित कर्तव्यावर असलेल्या व्यक्ती किंवा वाहनांना वगळण्यात आले आहे. तसेच रुग्ण वाहतूक कर्तव्यावरील हॉस्पिटल मधील डॉक्टर व पॅरामेडीकल स्टाफ, वीज, पाणी पुरवठा, दूरसंचार, औषधी वाहने,  अग्निशमन वाहने, बॅंकांची व एटीएम मध्ये पैसे भरणारी वाहने  व कर्तव्यावरील कर्मचारी, जीवनावश्यक वस्तू सेवा, माल यांची वाहतूक करणारे कर्तव्यावरील कर्मचारी अधिकारी, कर्तव्यावरील प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी तसेच जिल्हादंडाधिकारी यांनी परवानगी दिलेली वाहने व अधिकारी कर्मचारी यांची वाहने यांना यातून वगळ्यात आले आहे.
बाहेरगावाहून आलेल्या व्यक्तींची स्थानिक पातळीवर वैद्यकीय तपासणी
जिल्ह्यात बाहेरगावाहून  आलेल्या व्यक्तिंची वैद्यकीय तपासणी करण्यासाठीही स्थानिक पातळीवर सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.  त्यासाठी ग्रामिण भागात तालुका आरोग्य अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्रस्तरावर पथके तपासणी करतील. त्यासाठी त्या त्या तालुक्याचे गटविकास अधिकारी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांच्या नियंत्रणात नियोजन करतील. तर शहरी भागात महानगरपालिकेचे आयुक्त यांच्या नियंत्रणात नियोजन केले जाईल. त्यासाठी महापालिकेने वार्ड निहाय पथके नियुक्त केली असून नावे नोंदवून उद्यापासून ही तपासणी सुरु होईल.
मालमत्ता नोंदणी खरेदी ३१ पर्यंत बंद
जिल्ह्यातील मालमत्तांच्या खरेदी विक्री व नोंदणीची प्रक्रियाही येत्या ३१ तारखेपर्यंत बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकारी पापळकर यांनी दिले आहेत. मालमत्ता खरेदी विक्रीसाठी लोकांची होणारी गर्दी टाळण्यासाठी हे आदेश जारी करण्यात आले आहेत.आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ व साथरोग अधिनियम १८९७ मधील खंड २, ३ व ४   अन्वये हे आदेश जारी करण्यात आले आहेत.
प्रार्थनास्थळांवर जाण्यास मनाई
जिल्ह्यातील सर्व धर्मियांची प्रार्थनास्थळांवर जाण्यास मनाई  करण्याचे आदेश जिल्हाधिकारी पापळकर यांनी दिले असून  त्यानुसार आता कोणत्याही व्यक्तीला प्रार्थनास्थळांवर प्रवेश दिला जाणार नाही. केवळ त्या धर्माचे धर्मगुरु वा पुरोहित ह्यांनाच दैनंदिन आवश्यक गतिविधींसाठी प्रवेश दिला जाईल,असे स्पष्ट करण्यात आले आहेत.
जीवनावश्यक वस्तूंचे  वितरण सर्वदूर
दैनंदिन आवश्यकतेसाठी लागणारे दूध, भाजिपाला, अन्न धान्य किराणा वस्तूंचे वितरण हे नागरिकांना नजिकच्या दुकानांवर उपलब्ध होईल. जिल्ह्यात अन्नधान्य आदींचा मुबलक साठा असून कोणीही साठेबाजी करु नये असे निर्देश देण्यात आले आहेत.
अकोला शहरातील जनताबाजार येथे होणारी होलसेल खरेदी विक्री ही सकाळ सात पर्यंतच होईल. त्यानंतर विक्रेते शहरात विविध भागात जाऊन विक्री करतील. विक्रेते विक्री करतांनाही एक मिटरपेक्षा अधिक अंतरावर बसून विक्री करतील. ग्राहकांचीही गर्दी न होऊ देण्याची खबरदारी घेतील. या संदर्भात आज मनपा आयुक्त संजय कापडणीस व पोलीस अधिक्षक अमोघ गावकर यांनी संयुक्तरित्या पाहणी करुन हा निर्णय घेतल्याचे जाहीर केले.
जिमाकाच्या नावे बनावट मेसेज प्रकरणी पोलिसांत गुन्हा
जिल्हा माहिती कार्यालयाच्या नावाने बनावट माहितीचा मेसेज तयार करुन व्हॉट्सॲप वर व्हायरल केल्या प्रकरणी अज्ञात व्यक्ती विरुद्ध अकोला सिटी कोतवाली पोलिस स्टेशनला आज तक्रार नोंदविण्यात आली. कोरोना विषाणू संदर्भात जिल्हाधिकारी अकोला यांचेकडून आलेली माहिती असून ती जिल्हा माहिती कार्यालय अकोला यांनी प्रसारित केली अशा आशयाचा हा संदेश होता. तो व्हायरल झाल्याचे लक्षात येताच जिल्हा माहिती अधिकारी डॉ. मिलिंद दुसाने यांनी तो  मेसेज खोटा व बनावट असल्याचे नमूद करुन त्यांच्या कार्यालयामार्फत हा मेसेज देण्यात आला नसल्याचे स्पष्ट केले. त्यानंतर जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या निर्देशानुसार जिल्हा माहिती अधिकारी डॉ. मिलिंद दुसाने यांनी ही तक्रार सिटी कोतवाली पोलिसांत दिली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ