प्रतिबंधात्मक उपायांनीच दूर सारा कोरोना विषाणू-जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर



अकोला,दि.१२ (जिमाका)- कोरोना विषाणूचा संसर्ग होत असल्याचे आढळले असून त्यादृष्टीने अकोला जिल्ह्यात खबरदारीच्या उपाययोजना राबविण्यात येत आहेत. जिल्ह्यात एकही रुग्ण आढळला नसला तरी प्रतिबंधात्मक उपाय योजनांनी या विषाणूच्या संसर्गापासून आपण स्वतःचा बचाव करु शकतो,असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले आहे.
कोरोना विषाणू संसर्गाचे महाराष्ट्रामध्ये सुद्धा काही रुग्ण आढळुन आले आहेत. यासंदर्भात आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दूरचित्रवाणी परिषदेद्वारे राज्यातील सर्व जिल्ह्यांमधील स्थितीचा आढावा घेतला. या दूरचित्रवाणी परिषदेस अकोला जिल्ह्यातून जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, मनपा आयुक्त संजय कापडणीस,जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.सुभाष पवार, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.शिवहरी घोरपडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ सुरेश आसवले, जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. राजकुमार चव्हाण, जिल्हा माताबाल संगोपन अधिकारी डॉ मनिष शर्मा, मनपा आरोग्य अधिकारी डॉ.फारुक शेख, सहाय्यक आयुक्त अन्न व औषध प्रशासन  हेमंत मेटकर,आरोग्य विभागाचे जिल्हा माध्यम व विस्तार अधिकारी प्रकाश गवळी प्रामुख्याने सहभागी झाले होते. यावेळी जिल्ह्यात करण्यात येत असलेल्या प्रतिबंधात्मक व उपचारात्मक कार्यवाहीबाबत सविस्तर माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली. तसेच जिल्हास्तरावर क्वारंटाईन कक्षाची स्थापना, शहरातील हॉटेल्स, ट्रॅव्हल्स व टुर्स एजन्ट यांचेशी संपर्क साधुन परदेशातून येणारे नागरीकांची माहिती घेण्याबाबत मनपा प्रशासनाला सुचना दिल्यात. रुग्णालयांमध्ये औषधांचा तुटवडा भासणार नाही तसेच औषधांचा काळाबाजार होणार नाही, याची खबरदारी घेण्याबाबत अन्न व औषध प्रशासनाला सूचना दिल्यात.
जिल्हा प्रशासनाच्या वतीने नागरिकांसाठी सुचविण्यात आलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजना-
कोरोना आजाराला नागरीकांनी घाबरु नये पण जागरुक रहावे.सार्वजनिक ठिकाणी किंवा रस्त्यावर थंको टाळा व वैयक्तीक स्वच्छता ठेवावी. हातांची नियमीत स्वच्छता - वाहत्या पाण्यात साबणाने स्वच्छ हात धुवावे.आपले हात वारंवार डोळे, चेहऱ्यावर लावु नये.श्वसनसंस्थेचे आजार असलेल्या व्यक्तीशी निकट सहवास टाळावा.पुर्णपणे शिजवलेलेच अन्न खावे. फळे, भाजीपाला धुवुनच खाण्याकरीता वापरण्यात यावे. गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे, खोकतांना, शिकतांना नाका-तोंडावर रुमाल/टिश्यू पेपरचा वापर करावा व टिश्यू पेपर त्वरीत झाकण असलेल्या कचरा पेटीतच टाकावा. आवश्यकता नसल्यास बाहेरगावी प्रवास करणे टाळावे.ताप, सर्दी, खोकला व अंगदुखी असल्यास नजिकच्या आरोग्य संस्थेत आरोग्य अधिकारी यांच्याकडून तपासणी करुनच औषधोपचार करुन घ्यावा,सर्वसाधारण नागरीकांना मास्क वापरणे आवश्यक नाही, परंतु आवश्यकता वाटल्यास स्वतःजवळील स्वच्छ रुमाल वापरावा,आपल्या गावात दि. १ फेब्रुवारी २०२० नंतर परदेशातून एखादा व्यक्ती आल्यास त्याची माहिती त्वरीत जिल्हा सर्वोपचार रुग्णालयातील कोरोना व्हायरस नियंत्रण कक्षास दूरध्वनी क्रमांक ०७२४-२४२१७१८ वर देण्यात यावी.
जिल्हा नियंत्रण कक्ष स्थापन
आंतरराष्ट्रीय स्तरावर व देशांतर्गत कोरोना विषाणू संसर्ग बाधित रुग्ण आढळत आहे. तसेच देशाबाहेरुन तसेच देशांतर्गत विमान प्रवासाद्वारे प्रवासी प्रवास करीत आहेत. त्यामुळे संसर्ग वाढण्याची शक्यता लक्षात घेता प्रतिबंधात्मक उपाययोजना आखणे आवश्यक आहे. जिल्ह्यात आपत्तीजनक परिस्थिती उद्भवू नये यासाठी पूर्वतयारी म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयस्तरावर नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. नागरिकांनी संशयित संसर्गित व्यक्ती आढळल्यास किंवा एखाद्या व्यक्तीला प्रार्दुभाव झाल्यास जवळच्या आरोग्य केंद्रात तात्काळ संपर्क साधावा. त्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयस्तरावर नायब तहसिलदार संजय ढवळे यांचे नियंत्रणात नियंत्रण कक्ष कार्यरत करण्यात आला आहे.  कार्यालयीन दिवशी, रात्रीस व सुटीच्या दिवशीही या कक्षामध्ये कर्मचारी उपलब्ध राहतील. या कक्षाचा कक्षाचा दुरध्वनी क्रमांक ०७२४-२४२४४४४ असून कोरोना विषाणू संसर्गाच्या अनुषंगाने संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ