कृषि सेवा व निविष्ठा केंद्र सुरु ठेवा- ना.धोत्रे यांचे निर्देश;जिल्हाधिकाऱ्यांनी केले आदेश निर्गमित


अकोला,दि.२८ (जिमाका)-  कोरोना विषाणू संसर्ग प्रादुर्भावाच्या पार्श्वभुमिवर सुरु असलेल्या संचार बंदी कालावधीत  जिल्ह्यातील कृषि सेवा केंद्र व कृषि निविष्ठा केंद्र सुरु ठेवावीत असे निर्देश केंद्रीय मानव संसाधन विकास माहिती तंत्रज्ञान,  इलेक्ट्रॉनिक्स दूरसंचार राज्यमंत्री ना. संजय धोत्रे यांनी जिल्हा प्रशासनाला दिले. त्यानुसार जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी यासंदर्भातील आदेश निर्गमित केले आहेत.
यासंदर्भात आज  केंद्रीय राज्यमंत्री ना. धोत्रे यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतली. यावेळी आ. रणधीर सावरकर उपस्थित होते. यावेळी  जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, मनपा आयुक्त संजय कापडणीस, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. शिवहरी घोरपडे, निवासू उपजिल्हाधिकारी संजय  खडसे, तसेच अन्य अधिकारी उपस्थित होते. ना. धोत्रे म्हणाले की, शेतकऱ्यांचे काम थांबू नये, त्यास अडचण निर्माण होऊ नये म्हणून यासाठी जिल्ह्यातील कृषि निविष्ठा  व कृषि सेवा केंद्र सुरु ठेवावे. जेणे करुन शेतकऱ्यांना सुविधा होईल. तसेच  जिल्ह्यातील  रेशन दुकानदारांनी  गोरगरिबांना तीन महिन्याचे अन्न धान्य वाटप करण्यास सुरुवात करावी.  अकोला शहरात खडकी भागात केरळ मधील ग्लेझ इंडीया कंपनीचे २७० कामगार- कर्मचारी हे दाटीवाटीने रहात असल्याचे ना. धोत्रे यांनी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले.  त्यानुसार प्रांताधिकारी निलेश अपार आणि तहसिलदार विजय लोखंडे यांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन पाहणी केली. तसेच त्या परिसरातील १६ दुमजली सदनिकांमध्ये या कर्मचाऱ्यांना स्थलांतरीत केले. तसेच त्यांना अन्न धान्य पुरवठा ही करुन दिला. तसेच या सर्व कर्मचारी व कामगारांची वैद्यकीय तपासणी ही करण्यात आली.
ना. धोत्रे यांच्या सुचनेनुसार जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी जिल्ह्यातील कृषि सेवा केंद्र व कृषि निविष्ठा केंद्र अत्यावश्यक सेवा म्हणून फक्त सकाळी ११ ते दुपारी तीन यावेळात सुरु ठेवण्याचे निर्देशही जारी केले. या निर्देशानुसार   या केंद्रांवर पाच पेक्षा अधिक कर्मचारी कामगार काम करणार नाहीत, दुकानांमध्ये ग्राहकांची गर्दी  होणार नाही व ग्राहकांमध्ये किमान आवश्यक अंतर ठेवण्याची कार्यवाही करण्याची अटही नमूद करण्यात आली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ