मनपा पथकांची धडक कारवाई; तिघा रुग्णांविरुद्ध गुन्हे दाखल -पॉझिटीव्ह रुग्ण बाहेर फिरता कामा नये;जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

 






         अकोला,दि.२३ (जिमाका)- कोविड पॉझिटीव्ह असूनही होम आयसोलेशन मध्ये राहण्याचा सल्ला दिल्यानंतरही बाहेर फिरतांना आढळलेल्या तिघा रुग्णांविरुद्ध आज महानगरपालिकेच्या पथकाने गुन्हे दाखल केले. नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन कायदा अधिनियम  व भादंवि कलम १८८ अन्वये हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अशा प्रकारची कारवाई यापुढेही करण्यात यावी जेणे करुन पॉझिटीव्ह रुग्ण बाहेर फिरता कामा न नये, असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी आज येथे दिले.

            यासंदर्भात आज सायंकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत जिल्हाधिकारी पापळकर यांनी आढावा घेतला त्यावेळी ही माहिती देण्यात आली. या बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटीयार, मनपा आयुक्त निमा अरोरा, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश आसोले, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, उपविभागीय अधिकारी डॉ. निलेश अपार, मनपा उपायुक्त जावळे, डॉ. श्यामसुंदर शिरसाम, डॉ. अस्मिता पाठक आदी उपस्थित होते.

            यावेळी माहिती देण्यात आली की, शहरातील रहिवासी भागात तीन रुग्ण  पॉझिटिव्ह असून व होम आयसोलेशन सुचविण्यात आले असूनही बाहेर फिरतांना आढळले. मनपाच्या पथकांनी ही कारवाई केली. यावेळी जिल्हाधिकारी पापळकर यांनी सांगितले की, एका पॉझिटीव्ह रुग्णामागे किमान २० अतिजोखमीचे व १० कमी जोखमीचे संपर्कातील व्यक्तींची चाचणी करण्यात यावी. तसेच होम आयसोलेशन मध्ये असलेल्या रुग्णांवर लक्ष ठेवणे. त्यांच्या प्रकृतीची वेळोवेळी तपासणी करणे व रुग्ण घेत असलेल्या उपचारांबाबत पाठपुरावा करणे असे निर्देश जिल्हाधिकारी पापळकर यांनी मनपाच्या फिरत्या पथकांना दिले. तसेच अधिकाधिक लोकांच्या चाचण्या वाढवा, असेही निर्देश दिले.

दरम्यान नागरिकांनी मास्क वापरणे, वारंवार हात धुणे, सुरक्षित अंतर पाळणे या त्रिसुत्रीचा अवलंब करावा. विनाकारण घराबाहेर फिरु नये व सुरक्षित रहावे, असे आवाहनही जिल्हाधिकारी पापळकर यांनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ