400 व्यक्तींचा सुसज्ज निवारा केंद्र उभारणार - पालकमंत्री ना.बच्चू कडू

 





अकोला,दि. 13(जिमाका)- जिल्ह्यातील बेघर तसेच भिक्षेकरीसाठी 400 व्यक्तींचा राहण्याची व्यवस्था असलेले सुसज्ज बेघर निवारा केंद्र उभारणार असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री ना. बच्चू कडू यांनी केले. अकोट फैल येथील महानगरपालिका अंतर्गत असलेल्या आशाकिरण महिला विकास संस्थाव्दारा संचालीत संत गाडगेबाबा बेघर निवारा केंद्राला भेट दिली, त्यावेळी मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. यावेळी मनपा आयुक्त निमा अरोरा, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, उपविभागीय पोलिस अधीक्षक सचिन कदम,  आशाकिरण महिला विकास संस्थेच्या दुर्गाताई भड, महानगरपालिकेचे शहर अभियान व्यवस्थापक संजय राजनकर, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी विलास मरसाळे यांची विशेष उपस्थिती होती.

शहरातील भिक्षेकरी व्यक्तींना निवारा मिळवून देण्यासाठी मनपा, जिल्हा प्रशासन व पोलिस प्रशासनाच्यवतीने येत्या सोमवार पासून विशेष मोहिम राबविण्यात येणार आहे. शहरात असलेल्या 137 भिक्षेकरी व्यक्तींना जमा करुन त्यांच्यावर सामाजिक संस्थाच्या माध्यमातून समुपोदेशन करण्यात येवून त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यात येणार आहे. या प्रत्येक व्यक्तीच्या केस स्टॅडी तयार करण्याच्या सूचना पालकमंत्री ना. बच्चू कडू यांनी दिल्यात.

जिल्ह्यातील दानशुर व्यक्तीं व संस्थानी गाडगेबाबाचे विचार आत्मसात करुन समाजातील गरजूवंत, निराधार व्यक्तीकरीता काम करुन आत्मिक आनंद मिळवण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन पालकमंत्री यांनी  केले. यावेळी संत गाडगेबाबा बेघर निवारा केंद्रातील बेघर व्यक्तीची आस्थेने विचारपूस करुन पालकमंत्री ना. कडू यांनी त्यांच्यासोबत अल्पोहार केला व आपल्या भावना कृतीतून प्रगट केला.

सुसज्ज बेघर निवारा केंद्राचा प्रस्तावित जागेची पाहणी

रामदासपेठ पोलिस स्टेशन जवळील मनपा शाळा क्र.4 च्या इमारतीला भेट देवून सुसज्ज बेघर निवारा केंद्रासाठी प्रस्तावित जागेची पाहणी केली. 400 भिक्षेकरी व बेघर व्यक्तींचा निवारासाठी येथे   सुसज्ज अशी इमारत बांधण्यात येणार आहे. यासाठी नगरपालिका प्रशासनाकडून 2 कोटी 40 लक्ष रुपयांचा निधी उपलब्ध असून आवश्यकता पडल्यास जिल्हा नियोजन वार्षिक निधीतून निधी उपलब्ध करण्यात येईल, असे पालकमंत्री ना. बच्चू कडू यांनी सांगितले. यावेळी मनपा आयुक्त निमा अरोरा व कार्यकारी अभियंता अनंत गणोरकर, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

विधानसभा निवडणूकीसाठी 70 उमेदवारांचे अर्ज कायम