किलकारी आरोग्य योजना माता व बालकांसाठी विनामूल्य आरोग्य माहिती सेवा
किलकारी आरोग्य योजना
माता व बालकांसाठी विनामूल्य आरोग्य माहिती सेवा
अकोला, दि. ९ : किलकारी मोबाईल आरोग्य योजना ही गर्भवती महिला आणि नवजात
बाळांच्या पालकांसाठी केंद्र सरकारची मोबाईल-आधारित आरोग्य माहिती सेवा आहे.
या योजनेत नोंदणीकृत महिलांना त्यांच्या मोबाईलवर आठवड्यातून एकदा स्वयंचलित
व्हॉइस कॉल येतो. त्या कॉलमध्ये गर्भधारणा, प्रसूती, बाळाची काळजी, लसीकरण, स्तनपान,
पोषण आणि कुटुंब नियोजन याबाबत मार्गदर्शन दिले जाते.
ही योजना गर्भवती महिला आणि १ वर्षापर्यंतच्या बाळांच्या पालकांसाठी
आहे. स्थानिक भाषेत (मराठीसह) ऑडिओ संदेश दिले
जातात.गर्भधारणेच्या टप्प्यानुसार आणि बाळाच्या वयानुसार माहिती दिली जाते. मातामृत्यू
व बालमृत्यू कमी करण्यासाठी आरोग्य जागरूकता वाढवणे हा उद्देश आहे
महिलेची नोंदणी सरकारी आरोग्य यंत्रणेत (एएनएम, आशा, आरसीएच पोर्टल
इ.) झाल्यानंतर तिचा मोबाईल क्रमांक प्रणालीमध्ये नोंदवला जातो. त्यानंतर नियमित आरोग्यविषयक
कॉल येऊ लागतात. ही सेवा लाभार्थ्यांसाठी मोफत आहे.
किलकारी योजनेत नाव नोंदवायचे असल्यास आशा सेविका किंवा जवळच्या प्राथमिक
आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी बाळासाहेब
घुगे यांनी केले.
०००

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा