नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पात विविध योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन

 

 

नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पात

विविध योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन

अकोला दि. 4 : नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पात वैयक्तिक लाभासाठी अनेक घटक समाविष्ट आहेत. ठिबक व तुषार संचासाठी जास्त अर्ज येत आहेत. इतर घटकांसाठीही जिल्ह्यातील शेतक-यांनी अर्ज करून लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिका-यांनी केले आहे.

योजनेत शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविणे, नैसर्गिक साधनसंपत्तीचे संवर्धन करणे, हवामान बदलास अनुकूल शेती पद्धतींचा प्रसार करणे तसेच शाश्वत शेतीला प्रोत्साहन देणे या उद्देशाने विविध महत्वाकांक्षी घटक राबविण्यात येत आहेत.

प्रकल्पांतर्गत सध्या वानिकी आधारित वृक्ष लागवड, बांबू लागवड, गांडूळ खत व नाडेप, विहीर पुनर्भरण, फळबाग लागवड, पाईप व पंप संच (अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीतील लाभार्थी), ठिबक सिंचन संच, तुषार सिंचन संच, बिजोत्पादन, रेशीम उद्योग, वैयक्तिक शेततळे, गोड्या पाण्यातील मत्स्यपालन, शेततळे अस्तरीकरण, शेडनेटगृह । हरितगृहामधील लागवड साहित्य या वैयक्तिक लाभाच्या घटकांसाठी लाभ उपलब्ध करून देण्यात येत आहे.

प्रकल्पांतर्गत लाभ हस्तांतरण प्रणालीद्वारे पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये अनुदानाची रक्कम थेट जमा करण्यात येत असून, त्यामुळे अनुदान वितरण प्रक्रिया अधिक जलद, पारदर्शक व सुलभ झाली आहे. अकोला जिल्ह्यात निवड करण्यात आलेल्या गावांमध्ये सध्या प्रामुख्याने ठिबक सिंचन संच व तुषार सिंचन संच या घटकांसाठीच अर्ज प्राप्त झाले आहेत. इतर घटकांसाठी अपेक्षित प्रमाणात अर्ज प्राप्त झालेले नाहीत. त्यामुळे पात्र शेतकऱ्यांनी उपलब्ध विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी पुढाकार घ्यावा व अधिकाधिक अर्ज सादर करावेत,

इच्छुक लाभार्थ्यांनी प्रकल्पाच्या अधिकृत पोर्टलवर https://dbt-ndksp.mahapocra.gov.in ऑनलाईन नोंदणी करून अर्ज सादर करावेत. अर्ज भरताना आवश्यक कागदपत्रे व बँक खात्याची माहिती अद्ययावत ठेवावी.

अधिक माहितीसाठी प्रकल्प गावातील कृषिताई, समूह सहाय्यक तसेच स्थानिक कृषि कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन कृषि विभागाचे जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी, अकोला डॉ. मुरली इंगळे यांनी केले आहे.

०००

टिप्पण्या