जागतिक बालकामगार विरोधीदिनानिमित्त जनजागृती मोहिमेचा शुभारंभ

जागतिक बालकामगार विरोधीदिनानिमित्त जनजागृती

 

अकोला, दि. १५ : जागतिक बालकामगार विरोधी दिनानिमित्त जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा प्रशासनाच्या सहकार्याने जस्ट राईट फॉर चिल्ड्रेन व इंडियन सोशल वेलफेअर सोसायटीच्या संयुक्त विद्यमाने विविध जनजागृती उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.

जिल्हाधिकारी वर्षा मीना यांच्या उपस्थितीत बालतस्करी विरोधी


मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला.  जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी लक्ष्मण हगवणे, चाईल्ड लाईन समन्वयक हर्षाली गजभिये, जिल्हा प्रकल्प समन्वयक शंकर वाघमारे आदी उपस्थित होते. बसस्थानक, टॉवर चौक, रेल्वे स्टेशन तसेच शहरातील विविध गर्दीच्या ठिकाणी बालकामगार विरोधी दिनाची जनजागृतीसाठी मोहीम रॅली तसेच पथनाट्याच्या माध्यमातून राबविण्यात आली.

या निमित्ताने शहरातील विविध भागांमध्ये बालकामगार प्रथेच्या दुष्परिणामांविषयी नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली. विविध पोस्टर्स, बॅनर्स व माहितीपत्रकांच्या माध्यमातून बालहक्क, शिक्षणाचा अधिकार आणि बालकामगार निर्मूलनाबाबत संदेश देण्यात आला.

अकोला जिल्ह्यात इंडियन सोशल वेलफेअर सोसायटी ही स्वयंसेवी संस्था बालविवाह प्रतिबंध, बालकामगार प्रतिबंध व बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंध या विषयांवर सातत्याने कार्यरत आहे. संस्था जस्ट राईट्स फॉर चिल्ड्रन या बालहक्कांच्या राष्ट्रीय अलायन्सची भागीदार संस्था असून गोंदिया, अकोला, जालना, भंडारा या जिल्ह्यात विविध बालसंरक्षण उपक्रम राबवत आहे.

जून महिना ‘कृती महिना’ म्हणून साजरा करण्यात येत असून या कालावधीत जिल्हाभरातील दुकाने, आस्थापना व सार्वजनिक ठिकाणी बालकामगार शोध मोहीम राबवून माहिती संकलित केली जात आहे. संबंधित माहिती सरकारी कामगार अधिकारी कार्यालयाकडे पाठवून जास्तीत जास्त बालकामगारांची सुटका करण्यावर भर दिला जात आहे.

मोहिम यशस्वी होण्यासाठी जिल्हा बाल संरक्षण अधिकारी राजू लाडुलकर, चाईल्ड लाईन समन्वयक हर्षाली गजभिये, जिल्हा प्रकल्प समन्वयक शंकर वाघमारे, समन्वयक पूजा पवार, पूजा मनवर, कम्युनिटी सोशल वर्कर रवींद्र सावरकर, परमानंद मुरमकार, संजीवनी गवई, रेल्वे चाईल्ड लाईन सुप्रवायझर पद्माकर सदानशिव, अपर्णा सहारे, रेल्वे सुरक्षा दलाचे सहायक निरीक्षक रजनीकांत, रेल्वे पोलीस स्टेशन चे हेड कॉन्स्टेबल अशोक चांदूरकर, हर्षा सरदार यांनी सहकार्य केले.

  

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

आदर्श आचारसंहिता निवडणूक आचार संहिता म्हणजे काय ?

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन