पर्यावरण संरक्षणासाठी महाबीजचे हरित पाऊल
पर्यावरण संरक्षणासाठी महाबीजचे हरित पाऊल
'कार्यालय तेथे वड' उपक्रमांतर्गत महाबीज मुख्यालयात वटवृक्ष लागवड
अकोला, दि. २९: वड हे दीर्घायुषी पर्यावरणपूरक वृक्ष असून, त्याचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. वाढते प्रदूषण, हवामान बदल आणि घटते हरित क्षेत्र लक्षात घेता प्रत्येक कार्यालय परिसरात वड वृक्षांची लागवड व्हावी असे आवाहन महाबीजचे व्यवस्थापकीय संचालक दिलीप स्वामी यांनी केले.
पर्यावरण संवर्धन आणि हरित परिसर निर्मितीच्या उद्देशाने महाबीज मुख्यालयात 'कार्यालय तेथे वड लागवड' कार्यक्रमात ते बोलत होते.
व्यवस्थापकीय संचालक श्री.स्वामी यांच्या संकल्पनेतून वटपौर्णिमा निमित्त महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळा अंतर्गत येणारी सर्व कार्यालय परिसर बिज प्रक्रिया केंद्र, गोडावून येथे 'कार्यालय तेथे वड' उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.पर्यावरण संरक्षणासाठी महाबीजने वृक्षसंवर्धनाचा संदेश दिला.
यावेळी महाव्यवस्थापक (प्रशासन)
डॉ. एस. एस. गरकल,महाव्यवस्थापक (विपणन) व्ही.आर.देशमुख,महाव्यवस्थापक (प्रक्रिया)पी. जी. पागृत,महाव्यवस्थापक (उत्पादन)व्ही. व्ही. ठाकरे, प्रफुल्ल लहाने महाव्यवस्थापक गुणी,श्री.यादव महा व्यवस्थापक वित्त यांच्यासह महाबीज मुख्यालयातील विभागप्रमुख, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
श्री. स्वामी म्हणाले की,वड पर्यावरण संतुलन राखणारा अत्यंत महत्त्वाचा वृक्ष आहे. त्याचा विस्तीर्ण पसारा, दीर्घायुष्य आणि मोठ्या प्रमाणात प्राणवायू निर्माण करण्याची क्षमता यामुळे तो जैवविविधतेचा आधार मानला जातो. पक्षी, कीटक आणि इतर अनेक जीवांना वड आश्रय व अन्न उपलब्ध करून देतो. हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर अशा देशी वृक्षांचे संवर्धन ही काळाची गरज आहे.
उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी वृक्षसंवर्धनाची सामूहिक जबाबदारी स्वीकारत लावलेल्या वृक्षांचे नियमित संगोपन करून हरित परिसर निर्माण करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करण्यात येणार असल्याचे सांगितले.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा