कापूस उत्पादकता अभियानासाठी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करण्याचे आवाहन
कापूस उत्पादकता अभियानासाठी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करण्याचे आवाहन
अकोला, दि. १५: केंद्र शासनाच्या ‘कापूस उत्पादकता अभियान (कपास क्रांती)’ या महत्त्वाकांक्षी अभियानाची अंमलबजावणी सन २०२६-२७ ते २०३०-३१ या पाच वर्षांच्या कालावधीसाठी करण्यात येत आहे. या अभियानाअंतर्गत कापूस उत्पादकता वाढवण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध पीक प्रात्यक्षिकांचा लाभ घेण्यासाठी अकोला तालुक्यातील पात्र शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपन्या आणि कृषी क्षेत्रातील सहकारी संस्थांनी महाडीबीटी (MahaDBT) पोर्टलवर त्वरित अर्ज सादर करावेत, असे आवाहन अकोला तालुका कृषी अधिकारी कार्यालयामार्फत करण्यात आले आहे.
अभियानाची प्रमुख उद्दिष्टे आणि प्रात्यक्षिकांचे प्रकार:
महाराष्ट्र राज्यामध्ये सन २०३०-३१ पर्यंत कापूस उत्पादकता वाढवण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. त्यानुषंगाने अकोला तालुक्यात खालील प्रकारची प्रात्यक्षिके राबविण्यात येणार आहेत:
१. क्लोज स्पेसिंग प्रात्यक्षिके (९० x ३० सें.मी. अंतर): यासाठी प्रति हेक्टर १३,५०० रुपये व शेतीदिनासाठी ५०० रुपये अनुदान.
२. सघन कापूस लागवड (९० x १५ सें.मी. अंतर): यासाठी प्रति हेक्टर १८,००० रुपये व शेतीदिनासाठी ५०० रुपये अनुदान.
३. एकात्मिक पीक व्यवस्थापन (९० x ६० सें.मी. अंतर): यासाठी प्रति हेक्टर ७,००० रुपये व शेतीदिनासाठी ५०० रुपये अनुदान.
अटी व शर्ती:
ही प्रात्यक्षिके नोंदणीकृत शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपन्या आणि कृषी सहकारी संस्थांमार्फत राबविण्यात येतील.
निवड 'प्रथम अर्ज, प्रथम प्राधान्य' या तत्त्वावर केली जाईल.
प्रत्येक गटात किमान २५ शेतकरी असणे आवश्यक आहे.
प्रति गाव, प्रति पीक जास्तीत जास्त चार गटांची निवड केली जाईल.
लाभ घेणाऱ्या सर्व शेतकरी सदस्यांचा [आधार संलग्न मोबाईल क्रमांक] असणे अनिवार्य आहे.
संबंधित संस्थांना विहित नमुन्यात हमीपत्र सादर करणे आवश्यक आहे.
अकोला तालुक्यातील जास्तीत जास्त शेतकरी गटांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी आपल्या क्षेत्रातील कृषी सहाय्यक किंवा तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा