एकल महिला धोरणासाठी 23 जून रोजी जिल्हास्तरीय बैठक ठोस उपाययोजनांसह लिखित प्रस्ताव सादर करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन



अकोला, दि. १९: महाराष्ट्र शासनामार्फत राज्यातील विधवा, घटस्फोटित, परित्यक्ता, अविवाहित तसेच इतर एकल महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणासाठी स्वतंत्र व व्यापक ‘एकल महिला धोरण’ तयार करण्यात येत आहे. या धोरणाच्या निर्मितीत नागरिकांचा सक्रिय सहभाग मिळावा आणि धोरण अधिक परिणामकारक व लोकाभिमुख व्हावे, यासाठी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयाच्या वतीने मंगळवार, दिनांक 23 जून 2026 रोजी सकाळी 10.00 वाजता महिला व बाल विकास भवन, संतोषी माता मंदिराजवळ, अकोला येथे जिल्हास्तरीय बैठकीचे आयोजन करण्यात आले असून या दिवशी एकल महिला दिवस साजरा केला जाणार आहे

जिल्हाधिकारी श्रीमती वर्षा मीना यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या बैठकीत एकल महिलांच्या विविध समस्या, अडचणी आणि त्यांच्या निराकरणासाठी आवश्यक उपाययोजनांवर सविस्तर चर्चा करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील एकल महिला, नागरिक, स्वयंसेवी संस्था, महिला संघटना, सामाजिक कार्यकर्ते, अभ्यासक आणि विषयतज्ज्ञ यांनी या धोरण निर्मिती प्रक्रियेत सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी श्री. लक्ष्मण हगवने यांनी केले आहे.

एकल महिला धोरणाचा मसुदा तयार करताना केवळ समस्या मांडण्यापेक्षा त्या समस्यांवर शासनाने कोणत्या ठोस उपाययोजना कराव्यात, कोणत्या नवीन योजना राबवाव्यात, विद्यमान योजनांमध्ये कोणते बदल आवश्यक आहेत तसेच आवश्यकतेनुसार कोणत्या कायदे व नियमांमध्ये सुधारणा करण्यात याव्यात, याबाबत अभ्यासपूर्ण व सविस्तर प्रस्ताव सादर करणे अपेक्षित आहे.

प्रस्तावामध्ये संबंधित विषयाची पार्श्वभूमी, अपेक्षित उपाययोजना, संभाव्य लाभार्थी आणि त्याचे अपेक्षित परिणाम यांचा समावेश असावा. बैठकीस उपस्थित राहणे शक्य नसलेल्या नागरिकांनी व संस्थांनी आपले अभिप्राय व सूचना प्रशासनाच्या 8208581915 या अधिकृत व्हॉट्सॲप क्रमांकावर पाठवाव्यात.

प्राप्त होणाऱ्या सर्व नाविन्यपूर्ण सूचना व अभिप्रायांचा एकल महिला धोरणाचा मसुदा तयार करताना योग्य तो विचार करण्यात येणार असल्याने अकोला जिल्ह्यातील सर्व संबंधित घटकांनी या महत्त्वपूर्ण उपक्रमात मोठ्या संख्येने सहभागी होऊन शासनास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयामार्फत करण्यात आले आहे.

--

टिप्पण्या