‘स्टॉप डायरिया’ अभियानात घरोघर तपासण्या सर्व यंत्रणांनी गावोगाव समन्वयाने मोहिम राबवा - आरडीसी गजेंद्र मालठाणे
‘स्टॉप डायरिया’ अभियानात घरोघर तपासण्या
सर्व यंत्रणांनी गावोगाव समन्वयाने मोहिम राबवा
-
आरडीसी
गजेंद्र मालठाणे
अकोला, दि.१९: पाच वर्षांखालील बालकांमध्ये अतिसार (डायरिया) या
आजारामुळे होणारे मृत्यू आणि बालमृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत
‘स्टॉप डायरिया अभियान’ राबविण्यात येत आहे. जिल्ह्यातील १ लाख
१४ हजार १५८ बालकांची तपासणी व आवश्यक तिथे उपचार करण्यात येणार आहे. सर्व यंत्रणांनी
जिल्ह्यात ही मोहिम गावोगाव समन्वयाने राबवावी, असे निर्देश निवासी उपजिल्हाधिकारी
गजेंद्र मालठाणे यांनी आज येथे दिले.
अभियानाबाबत बैठक आरडीसी
यांच्या अध्यक्षतेत त्यांच्या दालनात झाली, त्यावेळी ते बोलत होते. जिल्हा आरोग्य अधिकारी
डॉ. बळीराम गाढवे, माता व बालसंगोपन अधिकारी विनोद करंजीकर, निवासी वैद्यकीय अधिकारी
श्रीमती डॉ. पांडे आदी उपस्थित होते.
जिल्ह्यातील सर्व उपकेंद्रे,
प्राथमिक आरोग्य केंद्रे, ग्रामीण रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालये, शासकीय आरोग्य संस्था
तसेच अंगणवाडी केंद्रांचा या अभियानात सक्रिय सहभाग राहणार आहे. पालकांना अतिसार झालेल्या
बालकांना तात्काळ ओआरएस द्रावण देणे, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार झिंक गोळ्यांचा वापर
करणे, सुरक्षित पिण्याच्या पाण्याचा वापर करणे आणि स्वच्छतेच्या सवयी अंगीकारणे याबाबत
मार्गदर्शन केले जाणार आहे.
अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी
जिल्ह्यात आशा स्वयंसेविका, आरोग्य कर्मचारी आणि विविध स्तरांवरील अधिकारी यांची नियुक्ती
करण्यात आली आहे. मोहिमेत बालकांची तपासणी, आवश्यकतेनुसार ओआरएस व झिंक गोळ्यांचे वितरण
केले जाणार असून अतिसार प्रतिबंधाबाबत जनजागृती करण्यात येणार आहे.
योग्य वेळी उपचार, ओआरएसचा
वापर आणि स्वच्छतेच्या सवयी यांमुळे या आजारावर प्रभावी नियंत्रण मिळविता येते. नागरिकांनी
स्वच्छता राखून सुरक्षित पिण्याच्या पाण्याचा वापर करावा तसेच अतिसाराची लक्षणे दिसताच
तातडीने जवळच्या आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
00000



टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा