दुग्धोत्पादनात जिल्हा स्वयंपूर्ण व्हावा प्रत्येक तालुक्यात क्लस्टर करा जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीत निर्देश आमदार हरीश पिंपळे, जिल्हाधिकारी वर्षा मीना यांची उपस्थिती

 





दुध उत्पादक सहकारी संस्था व प्रशासनाची बैठक

दुग्धोत्पादनात जिल्हा स्वयंपूर्ण व्हावा

प्रत्येक तालुक्यात क्लस्टर करा

जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीत निर्देश

आमदार हरीश पिंपळे, जिल्हाधिकारी वर्षा मीना यांची उपस्थिती

अकोला, दि. १८ : दुग्धोत्पादनात जिल्हा स्वयंपूर्ण होण्यासाठी चांगली दुधाळ जनावरे, उत्तम वैरण व्यवस्था व दुध उत्पादकांना व्यवसायासाठी शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळणे आवश्यक आहे. पशुसंवर्धन विभाग व सर्व संबंधित यंत्रणांनी त्यासाठी प्रयत्न करावे, तसेच जिल्हा दुध उत्पादक संघाशी समन्वय ठेवून प्रत्येक तालुक्यात क्लस्टर निर्माण करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीत देण्यात आले.

मूर्तिजापूरचे आमदार हरिश पिंपळे यांच्या सूचनेनुसार जिल्हा दुध उत्पादक सहकारी संस्था, दुध उत्पादक संस्था, जिल्हा प्रशासन व विविध यंत्रणांची बैठक जिल्हाधिका-यांच्या दालनात झाली. आमदार हरीश पिंपळे, जिल्हाधिकारी वर्षा मीना, जि. प. सीईओ अनय नावंदर, जिल्हा दुध उत्पादक संघाचे प्रशांत हजारी, शिवा मोहोड, नाना भिसे, जिल्हा दुग्धव्यवसाय विकास अधिकारी दे. जा. सोळंके यांच्यासह संघ व संस्थांचे सदस्य, कृषी, नाबार्ड, विदर्भ मराठवाडा दुग्धविकास प्रकल्प आदी यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते.  

आमदार श्री. पिंपळे म्हणाले की, जिल्ह्यातील दुध उत्पादक संस्था अडचणीत असून, त्यांचे बळकटीकरण होणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे, ५० टक्के अनुदानावर दुधाळ जनावरांचे दुग्ध उत्पादक संस्थांना वाटप, तसेच वैरण विकास कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी व्हावी. संस्थांचे संपूर्ण दूध संकलन करून संघामार्फत प्रक्रिया व वितरणाची व्यवस्था झाल्यास जिल्ह्यातील दूध स्थानिक स्तरावर उपलब्ध होईल. पशुसंवर्धन, दुग्धविकास, कृषी व सर्व संबंधित विभागांनी संघासोबत समन्वय ठेवावा. दुग्धोत्पादक शेतक-यांना योजनांचा लाभ द्यावा. दुग्धोत्पादकांना प्रक्रिया व व्यवसायासाठी कर्ज मिळण्यास बँकांनी सहकार्य करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

शासनाची नर पारडू संगोपन संवर्धन योजना व इतर योजनांची माहिती सर्वदूर पोहोचावी. चांगली दुधाळ जनावरे उपलब्ध होण्यासाठी प्रयत्न व्हावेत. योजनांबाबत दुग्धोत्पादकांच्या संघाच्या समन्वयाने कार्यशाळा घ्याव्यात. दुध उत्पादक संस्थांचे बळकटीकरण करणे, शीतकरण केंद्रांना चालना देणे, दुध संकलन मार्ग तयार करणे, शीतसाखळी निर्माण करणे आवश्यक आहे. त्यासाठी संघ व संस्थांशी समन्वय ठेवून सर्वंकष प्रयत्न करण्याचे निर्देश जिल्हाधिका-यांनी दिले.

पशुसंवर्धन विभागाकडे उपलब्ध आकडेवारीनुसार, जिल्ह्यात प्रजननक्षमता असलेली देशी गाय, संकरित गाय व म्हैस मिळून १ लक्ष १० हजार ५१ जनावरे आहेत. त्यात दुधाळ जनावरे ३४ हजार ७३७ आहेत. उपलब्ध आकडेवारीनुसार प्रतिदिन एकूण दुग्धोत्पादन १ लक्ष ५९ हजार २४ कि. आहे. जिल्ह्यात जळगाव येथून विकास दूध (१६ हजार २०० लि,), संगमनेर (अहिल्यानगर) येथून राजहंस दूध (९४००), बोदवड येथून अमर दूध (२०२००), नागपूर येथून दिनशॉ (१४ हजार), मदर डेअरी (७ हजार) असे एकूण ६६ हजार ८०० लि. दूध बाहेरून येते. शहरी व ग्रामीण भागात गवळी पद्धतीनुसार घरोघरी होणारे वाटप अंदाजे २ ते ३ लाख लि. आहे.

०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन