पीक-विशिष्ट उत्पादन कृषी योजनांचा जिल्हाधिका-यांच्या अध्यक्षतेत आढावा कृषी योजनांचा जिल्ह्यातील अधिकाधिक शेतक-यांना लाभ द्यावा जिल्हाधिकारी वर्षा मीना
पीक-विशिष्ट उत्पादन कृषी योजनांचा जिल्हाधिका-यांच्या अध्यक्षतेत आढावा
कृषी योजनांचा जिल्ह्यातील अधिकाधिक शेतक-यांना लाभ द्यावा
जिल्हाधिकारी वर्षा मीना
अकोला, दि. १७ : शासनाच्या राष्ट्रीय खाद्य तेल अभियान- तेलबिया, कापूस
उत्पादकता अभियान, कडधान्य आत्मनिर्भरता अभियान, कृषी समृद्धी योजना या योजना शेती
क्षेत्राच्या व शेतक-यांच्या उन्नतीसाठी महत्वपूर्ण आहेत. त्यांची माहिती सर्वदूर पोहोचवून
जिल्ह्यातील अधिकाधिक शेतक-यांना लाभ मिळवून द्यावा, असे निर्देश जिल्हाधिकारी वर्षा
मीना यांनी आज येथे दिले.
पीक विशिष्ट उत्पादन मोहिम व विविध कृषी योजनांबाबत आढावा बैठक जिल्हाधिका-यांच्या
अध्यक्षतेत झाली, त्यावेळी त्या बोलत होत्या. जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी डॉ. मुरली
इंगळे, कृषी उपसंचालक हरिश देशमुख यांच्यासह सहकार विभाग, लीड बँकेचे प्रतिनिधी, प्रगतीशील
शेतकरी बांधव उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्रीमती मीना म्हणाल्या की, पीक विशिष्ट उत्पादन मोहिमेच्या
माध्यमातून विविध अभियान व योजना शेतक-यांसाठी महत्वपूर्ण आहेत. त्याचा अधिकाधिक शेतक-यांना
लाभ मिळाला पाहिजे. योजनेची माहिती प्रसिद्धी व यशोगाथेच्या माध्यमातून सर्वदूर पोहोचावी.
लक्ष्यांकानुसार नियोजित कामे गुणवत्तापूर्ण व्हावीत. या माध्यमातून कृषीपूरक उद्योगांना
सर्वदूर चालना द्यावी, असे निर्देश त्यांनी दिले.
खाद्यतेल अभियानात अकोला जिल्ह्यात सोयाबीन व भूईमूग पीकांची निवड करण्यात
आली आहे. त्यात सुधारित तंत्रज्ञान प्रात्यक्षिके आणि तेल काढणी युनिटची स्थापना व
पायाभूत सुविधांचा विस्तार करण्यात येणार आहे. सोयाबीन व भूईमुगाचे प्रमाणित बियाणे
वितरण (१५०० क्विंटल), तसेच या दोन्ही पीकांचे एकूण ३७५ हे. क्षेत्रावर पीक प्रात्यक्षिके,
त्याचप्रमाणे, शेतकरी शेतीशाळा, प्रशिक्षण, मृद आरोग्य तपासणी सहाय्य, कृषी मॅपर अर्थसाह्य,
गोदाम बांधकाम, मिनी ऑईल मिल आदी लाभ देण्यात येणार आहेत.
कापूस उत्पादकता अभियानात (कापूसकांती) जिल्ह्यात ६ कोटी ३१ लक्ष ९२
हजार रू. आर्थिक लक्ष्यांक आहे. सघन लागवड पद्धतीवर विशेष प्रति हे. १८ हजार ५०० रू.
अनुदान देय आहे. त्याशिवाय बायोबार, कॉटन श्रेडर, प्रशिक्षण आदी बाबींचा समावेश आहे.
कृषी समृद्धी योजनेत पायाभूत सुविधांची उभारणी, उत्पादकतावाढ, शाश्वत
शेती प्रसार व आर्थिक वृद्धी अपेक्षित आहे. त्याअंतर्गत नाविन्यपूर्ण योजनेत चिया लागवडीचा
३ हजार ५००, गोदाम प्रकल्पाचा १८, शेतकरी अभ्यास दौ-याचा
३५०, बेड मेकर यंत्राचा ३०२,
स्पायरल सेपरेटरचा १ हजार ६२५ व मनुष्यचलित टोकन यंत्राचा ७०० अशा एकूण ६ हजार ४९५
लाभार्थ्यांचा लक्ष्यांक आहे.
कडधान्य आत्मनिर्भर अभियानात एकूण ६२० हे. वर तूर, मूग व उडीद पीकासाठी
सलग गट प्रात्यक्षिके, या तिन्ही पीकाचे १ हजार ५४० क्विं. (५ वर्षांच्य आतील) प्रमाणित
बियाणे वितरण आणि ५ वर्षांच्या वरील परंतु १० वर्षांच्या आतील ३ हजार १२० क्विं. प्रमाणित
बियाणे वितरण अपेक्षित आहे. या योजनांची माहिती व लाभ जास्तीत जास्त शेतक-यांना मिळवून
द्यावा, असे निर्देश जिल्हाधिका-यांनी दिले. डॉ. इंगळे यांनी सादरीकरण केले.
००००


.jpeg)

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा