पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना आधार व ॲग्रीस्टॅक नोंदणी करून घ्यावी जिल्हा उपनिबंधकांचे आवाहन

 

 

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना

आधार व ॲग्रीस्टॅक नोंदणी करून घ्यावी

जिल्हा उपनिबंधकांचे आवाहन

अकोला, दि. २४ : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळण्यासाठी शेतक-यांचा आधार क्रमांक व ॲग्रीस्टॅक आयडी अनिवार्य असून, संबंधित बँकेकडे माहिती उपलब्ध असणे आवश्यक आहे. तरी संबंधित शेतक-यांनी आधार व ॲग्रीस्टॅक नोंदणी करून माहिती बँकेला किंवा सेवा सहकारी संस्थेला सादर करावी, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक गीतेशचंद्र साबळे यांनी केले आहे.

योजनेत शेतकऱ्यांनी सेवा सहकारी संस्था (जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक), राष्ट्रीयकृत, ग्रामीण, खासगी बँकांकडून दि. 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2025 दरम्यान उचल केलेल्या व दि. 30 सप्टेंबर 2025 अखेर थकित असलेल्या आणि दि. 31 मार्च 2026 अखेर परतफेड न झालेल्या एक किंवा अनेक बँकांकडील सर्व थकित पीककर्ज, पुनर्गठन, फेरपुनर्गठन थकबाकीचे मुद्दल व व्याजासह अधिकतम रक्कम रु.2 लाखापर्यंत लाभ देण्यात येणार आहे.

तसेच, थकबाकीची रक्कम रु.2 लाखापेक्षा जास्त असल्यास अशा शेतकऱ्याने प्रथम 2 लाखापेक्षा जास्त असलेली थकित रक्कम परतफेड करणे आवश्यक असून अशी रक्कम परतफेड केल्यानंतर पात्र शेतकऱ्याला एकवेळ समझोता योजनेंतर्गत रु.2 लाख रकमेचा लाभ देण्यात येणार आहे.

ज्या शेतकऱ्यांनी महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 या योजनेचा लाभ घेतलेला आहे अशा शेतकऱ्यांना सर्व कर्ज खात्यातील एकत्रित थकबाकीची मुद्दल व व्याजासह एकूण रक्कम रु.50 हजाराचा लाभ देण्यात येणार आहे. तसेच सन 2022- 23, 2023-24, 2024-25 या तीन आर्थिक वर्षापैकी कोणत्याही दोन आर्थिक वर्षात पिक कर्जाची उचल करून आर्थिक वर्ष संपल्यानंतर 30 जून पूर्वी किंवा बँकेच्या प्रचलित नियमानुसार विहित कालावधीत परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना रु.50 हजार इतक्या अधिकतम रकमेचा लाभ देण्यात येणार आहे. तसेच पीक कर्जाची रक्कम रु.50 हजार पेक्षा जास्त असल्यास प्रत्यक्ष परतफेड केलेली रक्कम किंवा किमान रु.5 हजार एवढा प्रोत्साहनपर लाभ देण्यात येणार आहे. सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांचा आधार क्रमांक व अॅग्रीस्टेंक आय.डी. अनिवार्य केलेला असून सदर माहिती संबंधित बँकेकडे उपलब्ध असणे आवश्यक आहे.

तरी सर्व शेतकऱ्यांनी त्यांचे आधार क्रमांक व अॅग्रीस्टेंक आय. डी. बाबतची माहिती त्यांच्या बँक शाखेस तात्काळ सादर करण्याबाबत जिल्हाधिकारी वर्षा मीना, तसेच जिल्हा उपनिबंधक श्री. साबळे यांनी आवाहन केले आहे. तसेच ज्या पात्र शेतकऱ्यांची अद्याप अॅग्रीस्टॅक नोंदणी केलेली नाही, अशा शेतकऱ्यांनी त्वरीत अॅग्रीस्टेक नोंदणी करून त्यांची माहिती बँकेस,  सेवा सहकारी संस्थेस त्वरित सादर करणेबाबत आवाहन करण्यात आलेले आहे.

00000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

आदर्श आचारसंहिता निवडणूक आचार संहिता म्हणजे काय ?

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन