परिवहन मंत्र्यांनी केली मध्यवर्ती बसस्थानकाची पाहणी



 

परिवहन मंत्र्यांनी केली मध्यवर्ती बसस्थानकाची पाहणी

 

अकोला, दि. ८ :  राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी अकोला येथील मध्यवर्ती बसस्थानकाला अचानक भेट देत प्रवाशांसाठी उपलब्ध असलेल्या विविध सुविधांची प्रत्यक्ष पाहणी केली.

बसस्थानकातील स्वच्छता व्यवस्था, सुरक्षा उपाययोजना, प्रतीक्षागृह, स्वच्छतागृहे, पिण्याच्या पाण्याची सुविधा, तिकीट आरक्षण केंद्र तसेच खाद्यपदार्थ विक्री केंद्राची सखोल तपासणी करून संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या.

यावेळी श्री.सरनाईक यांनी प्रवाशांशी थेट संवाद साधून त्यांच्या अडचणी आणि जाणून घेतल्या. काही ठिकाणी स्वच्छतेबाबत अधिक दक्षता घेण्याचे निर्देश देत एसटी ही महाराष्ट्राच्या सर्वसामान्य जनतेची जीवनवाहिनी असल्याचे अधोरेखित केले.

 

बसेसच्या वेळापत्रकानुसार धावण्याची स्थिती, चालक-वाहकांची उपस्थिती, तांत्रिक देखभाल आणि सुरक्षा व्यवस्थेचाही आढावा घेतला. प्रवाशांना स्वच्छ, सुरक्षित आणि दर्जेदार सेवा मिळावी यासाठी प्रशासनाने नियमित निरीक्षण करून तत्काळ उपाययोजना कराव्यात, असे निर्देश दिले.

 

राज्यातील प्रत्येक एसटी बसस्थानक हे प्रवाशांच्या विश्वासाचे केंद्र बनावे, यासाठी स्वच्छता, शिस्त, वक्तशीरपणा आणि सुरक्षितता या बाबींमध्ये कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असे निर्देश त्यांनी दिले. यावेळी विभागीय नियंत्रक, आगार व्यवस्थापक, स्थानक प्रमुख तसेच एसटी महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन